शेतकऱ्यांनी एआय आधारित शेतीकडे वळावे : भाग्यश्री पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर :  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात वाढ होणार असून, पाणी व खताच्या वापरात बचत होईल. याशिवाय संभाव्य किडी, रोग यासंदर्भातील अलर्ट मोबाईलवर मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे निरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एआय आधारित शेतीकडे वळावे, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.  नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यात बसविण्यात येणाऱ्या नवीन मिल रोलरच्या पूजनप्रसंगी रविवारी त्या बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक मंडळातील लालासाहेब पवार, अॅड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, तसेच महिला संचालक कल्पना शिंदे, संगिता पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कारखान्याच्या यंत्रणांची तयारी अंतिम टप्प्यात असून, शासन धोरणानुसार हंगाम वेळेवर सुरू करण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. गेल्या २४ वर्षांपासून कारखाना शेतकऱ्यांना चांगला दर देत असून, हे नाते भविष्यातही मजबूत राहावे यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे नोंदवण्याचे आवाहन अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.

कारखान्याची ६५०० मे. टन ऊस गाळप क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित

प्रत्येक दिवशी सुमारे ६५०० मे. टन ऊस गाळप क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित असून, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्था पूर्णतः सज्ज आहे. यंदा क्षेत्रात समाधानकारक पावसामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »