‘कर्मयोगी’तील आर्थिक व्यवहारांची लेखापरीक्षकाकडून चौकशी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यामधील साखरेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. तक्रारदार रमेश धवडे यांच्याकडून प्राप्त तक्रारअर्जानुसार सखोल चौकशी करावी आणि स्वयंस्पष्ट लेखी अहवाल आठ दिवसांत सादर करावा, अशा सूचना पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी विशेष लेखापरीक्षक डी. एन. पवार यांना दिल्या आहेत.


कर्मयोगी कारखान्यातील साखर विक्री व व्यवहाराबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी भिगवण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कारखान्याचे सभासद रमेश धवडे हे पुण्यातील साखर संकुलसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या कारखान्याच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी थेट साखर आयुक्त कार्यालयासमोरच धवडे यांनी उपोषण सुरू केल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.

अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक रामदास लोकरे यांनी केलेल्या साखर विक्री व्यवहाराची तपासणी करावी. १५० कोटी कर्जाच्या पैशाचे त्यांनी काय केले? त्याचा हिशेब देत नाहीत. म्हणून कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही धवडे यांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी सांगितले की, धवडे यांच्या अर्जावर सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक वर्ग १ (साखर) डी. एन. पवार यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. आठ दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »