ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

जमखंडी(कर्नाटक): ऊसतोडीचा हंगाम संपवून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातली आहे. जमखंडी तालुक्यातील कट्टीकेरेजवळ शनिवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात एका बालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ मजूर जखमी झाले आहेत.
मृत आणि जखमी सर्व मजूर महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील गुपावाडी येथील रहिवासी आहेत. मुधोळ रोडवरून जात असताना ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रॉलीचा संपर्क तुटला. यामुळे ट्रॉली रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात उलटली.
मृत व्यक्तींची नावे: मनीषा पुंडलिक पांडे (२३), हलकी पुंडलिक पांडे (२), लक्ष्मी समदास चीरमडी (२७) आणि रेखा पांडुरंग भुके (२८).
जखमींची अवस्था:
या अपघातात १७ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारांसाठी विजापूर (विजयपुरा) येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ऊसतोड संपवून आनंदाने घरी परतणाऱ्या या मजुरांचे संसारोपयोगी साहित्य अपघातामुळे परिसरात विखुरले गेले असून, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.






