दोन माजी आमदारांसह ‘स्वामी समर्थ’च्या 24 संचालकांवर गुन्हा

सोलापूर/नगर : तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची 46 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील, आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या 24 संचालकांवर अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा बॅंकेचे इन्स्पेक्टर लक्ष्मीपुत्र हौदे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील साखर कारखाना विक्री प्रकरणात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यापोटी साखर कारखान्याने बॅंककडे साखर तारण ठेवली हेाती. त्यानुसार मंजूर कर्जातील रक्कम श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंटवर बँकेकडून जमा करण्यात आली होती.
तत्पूर्वी कारखान्याचे अधिकारी आणि पदाधिकारी संचालक मंडळांनी जिल्हा बँकेच्या नावे करारनामा, वचनचिठ्ठी, हमीपत्र व ताबेगहण लिहून दिले होते. त्यानुसार ताबा आमच्या बँकेकडे दिला होता. त्याप्रमाणे बँकेने साखर तपासून गोदामाला कुलूप लावून सील केले होते.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ रामचंद्र भरमशेट्टी, संचालक, माजी आमदार शिवशरण हणमंतप्पा बिराजदार, सुरेश भीमशा गड्डी, बसलिंगप्पा शिवशरण खेडगी, स्वामीराव रावसाहेब पाटील, महेश लक्ष्मीपुत्र पाटील, शरणबसप्पा कल्याणप्पा बिराजदार, जयशेखर शिवबसप्पा पाटील, संजीव सिद्रामप्पा पाटील, विवेकानंद बसप्पा उंबरजे, अनिता अप्पासाहेब पाटील, प्रकाश गुरण्णा खांडेकर, हणमंतप्पा बसलिंगप्पा कात्राबाद, बोंडग्या चंद्रमप्पा यमाजी, भीमाशंकर मलप्पा धोत्री, शांतबाई धुळप्पा बाके, तुळसाबाई भीमाशंकर वाघमोडे, यशवंत अंबादास धोंगडे, निजामोद्दीन करमोडीन बिराजदार, श्रीमंत शिवलिंगप्पा देसाई, पिरोजी पुंडलिक शिंगाडे, जलील बंदेनवाज बागवान, प्रभारी कार्यकारी संचालक चंद्रकांत नामदेव मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरण
देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध शुक्रवारी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
रामदास ज्ञानदेव घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारखान्याच्य विक्रीत गैरव्यवहारप्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेन न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पारनेन पोलिस ठाण्यात क्रांती शुगर अॅण्ड पावन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंद नवले, गुलाब नवले, शिवराज नवले श्रीधर नवले व निवृत्ती नवले या नऊ संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनंत भुईभार व अनिल चव्हाण या दोन अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल् झाला आहे.