अज्ञाताने लावलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गुन्हा दाखल; सुरक्षा उपाययोजनांची मागणी

नंदुरबार : तब्बल पाच एकर ऊसपिकाला अज्ञाताने आग लावल्याने ऊस जळून खाक झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांनी पोलिस दलासह जिल्हा प्रशासनाने उसाच्या संरक्षणाकरिता स्वतंत्र पथक नेमण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या काही काळात तालुक्यात उस तोड सुरु होणार आहे. यात आगीच्या घटना पुन्हा सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील मोहिदा येथील शेतकरी मनीलाल छगन पाटील यांचे उमरी शिवारात शेत आहे. यंदा याठिकाणी त्यांनी पाच एकर ऊस लागवड केली होती. महिनाभरानंतर उसाची तोडणी होणार असल्याने सध्या पाणी देण्याचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी उसाच्या शेतातून अचानक धूर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होते. यानंतर शेतकरी मणिलाल पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली असता उसात आग लागल्याचे निदर्शनास आले. अवघ्या काही क्षणात उसाला आग लागून खाक झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शेतकरी व मजूरांनी प्रयत्न केला. अज्ञात व्यक्त्तीने ही आग लावल्याचे समोर आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »