पाच हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मोफत एआय

पुणे : ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वापरासाठी तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य ‘एआय’ तंत्रज्ञान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘व्हीएसआय’च्या झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) रविवारी पार पडली. दरम्यान, या बैठकीत साखर उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि साखर कारखान्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, खासदार विशाल पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयानुसार आतपर्यंत ऊस शेतीमध्ये ‘एआय’चे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी ८५० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून येत्या काही दिवसांत उर्वरित चार हजार १५० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. नव्या निर्णयानुसार ‘व्हीएसआय’चा वाटा दुप्पट झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणताही आर्थिक भार उरणार नाही. त्यामुळे आता ‘व्हीएसआय’ १८ हजार २५० रुपये प्रतिहेक्टर देणार, तर साखर कारखाने सहा हजार ७५० रुपये भरतील. अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपयांचा खर्च पूर्णपणे भरला जाणार आहे.
‘एनसीडीसी’ देणार भांडवल
बैठकीनंतर झालेल्या सादरीकरणामध्ये अजित पवार म्हणाले, काही कारखान्यांना त्यांचा उद्योगवाढीसाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) भांडवल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कारखान्यांचे व्यवहार चोख असणे गरजेचे आहे. ‘एआय’चा वापर वाढण्यासाठी राज्य सरकार आणि ‘व्हीएसआय’ प्रयत्न करीत आहे.
पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू
दरम्यान, पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी मुख्य सचिवांसोबत होणाऱ्या बैठकीत या संदर्भातील अहवाल तपासले जाणार आहेत. मदतनिधीची तरतूद पूर्ण झाली असून, ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.