सोमेश्वर कारखाना ठरला राज्यात *सर्वोत्कृष्ट*, व्हीएसआयचे (VSI) पुरस्कार जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठीचे विविध स्तरावरील पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षाचा मानाचा ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सोमेश्वरनगर याने पटकावला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या सर्वोच्च पुरस्काराचे स्वरूप आहे. तर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि दौंड शुगरचे कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालकाचा पुरस्कार (विभागून) जाहीर झाला आहे. रोख एक लाख रूपये आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा माझा एकट्याचा नव्हे, तर श्री विघ्नहर कारखान्याचा सन्मान आहे, याचे सारे श्रेय संपूर्ण टीम आणि आमचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाला आहे, असे प्रतिक्रिया श्री. घुले यांनी व्यक्त केली.

श्री. गायकवाड म्हणाले की, दौंड शुगरमध्ये आमच्या टीमने केलेल्या कामाची दखल व्हीएसआयने घेतली आहे. हा पुरस्कार मला वैयक्तिक पातळीवर झाला असला, तरी तो कारखान्याचा आणि आम्हा सर्वांचा सन्मान आहे.

सोमेश्वर कारखान्याची सरशी सोमेश्वर कारखान्याने हंगाम २०२४-२५ मध्ये १२,२४,५२४ मे. टनाचे गाळप करून १४,५६,२०५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याचा उतारा ११.८९% इतका राहिला असून, वीज विक्रीतूनही मोठे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केल्याबद्दल या कारखान्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.

महत्त्वाचे राज्यस्तरीय पुरस्कार:

  • सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार (कै. विलासरावजी देशमुख पुरस्कार): हा पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. साखर कारखाना (सांगली) आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखाना (सातारा) यांना विभागून देण्यात आला आहे.
  • सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार (कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील पुरस्कार): धाराशिव जिल्ह्यातील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याला मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार: कोल्हापूरच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिरोळ) याने एक लाख रुपयांचा हा पुरस्कार पटकावला.
  • सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार (कै. रावसाहेबदादा पवार पुरस्कार): सांगलीच्या राजाराबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.

शेतकऱ्यांचा गौरव:

राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे

: १. पूर्व हंगाम: श्री. नितीन भामराव काळे (विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखाना, सोलापूर) – २९८.२१ मे. टन/हेक्टरी.

२. सुरू हंगाम: श्री. अनिल सदाशिव लाड (डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. साखर कारखाना, सांगली) – २५७.०९ मे. टन/हेक्टरी

३. खोडवा हंगाम: श्री. प्रदीप बाबासो नांगरे (यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखाना, सांगली) – २५०.०० मे. टन/हेक्टरी.

वैयक्तिक अधिकारी पुरस्कार:

साखर कारखान्यांच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे:

  • सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक: श्री. शहाजी बाळसाहेब गायकवाड (दौंड शुगर) आणि श्री. भास्कर सदाशिव घुले (श्री विघ्नहर सह. साखर कारखाना) .
  • सर्वोत्कृष्ट शेती अधिकारी: श्री. सुजय कुमार तानाजी-पाटील (राजाराबापू पाटील सह. साखर कारखाना).
  • सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर: श्री. भूषण अशोक नंद्रे (द्वारकाधीश साखर कारखाना, नाशिक).

पुरस्कारांचे विश्लेषण:

यावर्षी एकूण २५ कारखान्यांची पुरस्कारासाठी निवड झाली, ज्यामध्ये १७ सहकारी आणि ८ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच १० शेतकऱ्यांना वैयक्तिक ऊस भूषण आणि ८ अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आले.

विजेत्या सर्व कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने रोख पुरस्कार, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .

गतवर्षीपासून पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सर्व पहिले पुरस्कार आता एक लाखाचे झाले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »