नफ्यातील ७० टक्के रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘आंदोलन अंकुश’चे कारखान्यांना निवेदन

जयसिंगपूर : गेल्या वर्षी उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे, त्यामुळे कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना त्वरित आदा करूनच साखर कारखाने सुरू करावेत, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने सोमवारी (दि. १६) करण्यात आली.

सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोमवारी पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी दत्त, शरद आणि श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी यांसह विविध प्रमुख मागण्यांचे निवदेन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थीत होते.  

‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘साखर कारखाने हे प्रक्रिया उद्योग आहेत. कारखान्यात शेतकऱ्यांचा कच्चा माल असलेल्या उसाचे पक्क्या मालात रूपांतर करून तो पक्का माल बाजारात विकायचा आणि उत्पादन खर्च भागवून उर्वरित सर्व पैसे कच्च्या मालाच्या उत्पादकाला द्यायचे असतात. गेल्यावर्षी उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे. यातून साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना नफ्यातील ७० टक्के रक्कम देण्यास काय हरकत आहे. तसेच शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत दुसरा हप्ता देऊन ऊस हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करावा. यासाठी गुरुदत्त, दत्त, शरद साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना मोटारसायकल रॅलीने निवेदन दिले आहे.

कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल, तर त्यांनी उसाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडावी. शेतकरी संघटनांशी चर्चा करून ऊस दराचा तोडगा काढून आंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, नागेश कोळी, संभाजी शिंदे, उदय भोगले, प्रमोद बाबर, दत्तात्रय जगदाळे, उद्धव मगदूम, राजू पाटील, महेश जाधव, भूषण गंगावणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »