‘पाडेगाव ऊस केंद्राला’ही ‘एआय’साठी निधी द्या’

पुणे ः कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती या शेतकऱ्यांसाठी दिल्या आहेत. उसातील एआयसाठी राज्याने अर्थसंकल्पात केलेल्या ५०० कोटी रुपये तरतुदीतील वाटा पाडेगावलाही द्यावा, अशी आमची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांची मंगळवारी (दि. २२) त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्यांशी एआय तंत्रज्ञानासह काटामारी, उतारा चोरी आणि थकीत एफआरपीच्या प्रश्नांवर चर्चा केली, त्यावेळी त्यांनी या मागण्या केल्या. काटामारी आणि उतारा चोरी रोखण्यासाठी दोन्ही पवार एकत्र येऊन योग्य ती कारवाई केल्यास शेतकऱ्यांसह मलाही सर्वाधिक आनंद होईल.
‘एआय’द्वारे उसाची काटामारी, उताऱ्याची चोरीही रोखा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्यांकडून उसाच्या वजनात होणारी काटामारी, साखर उताऱ्याचीही चोरी करून सर्रास लूट होत आहे. त्यावर पवार काका-पुतणे मूग गिळून का गप्प आहेत, असा सवाल शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) ऊस उत्पादनवाढीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे टोकाचे मतभेद विसरून सोमवारी साखर संकुलमध्ये एकत्र आले, ही चांगली बाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी हा सवाल केला. चालू वर्षी कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के ऊस कमी पडला आहे. त्यामुळे प्रक्रिया खर्चात वाढ होऊन उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उताऱ्यात झालेली घट ही कागदावर दाखविण्यात येत आहे. साखर गोदामांमध्येच असून, कारखान्यांकडून उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे. उताऱ्यात होणाऱ्या चोरीमुळे हे सर्व होत असून, त्यावर कोणीच कारवाई करीत नसल्याचे आम्ही साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे ते म्हणाले.
…तर सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज
राज्यात दोन्ही ठाकरे आणि पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. मग सर्व शेतकरी नेते एकत्र येणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर सरकारशी दोन हात करायला सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येण्याची तयारी ठेवावी. त्यामध्ये जे येतील ते सोबत घेऊ, असे शेट्टी म्हणाले.