‘गोडसाखर’मध्ये कडवटपणा वाढला, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी
कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या अर्थात ‘गोडसाखर’च्या कारभाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊन, प्रकरण एकमेकांवर गंभीर आरोप करण्यातपर्यंत गेले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चेअरमन शहापूरकर यांनी राजीनामा पत्रात अनेक गंभीर आरोप केले, तर त्यांनी कारखान्याला संकटात ढकलून पळ काढला, असे प्रत्युत्तर त्यांच्या विरोधकांनी दिले.
कारखान्याच्या कामकाजात उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पाच संचालकांकडून सातत्याने अडथळा आणला जात असल्याचा आरोप करून अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सभासद व कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या ठरावानुसार मी योग्य निर्णय घेत कामकाज सुरू केले. गाळप क्षमता वाढविणे, आसवनी प्रकल्प उभा करण्यास मोठ्या कर्जाची गरज होती. तसेच अनेक प्रमुख मशीनरींची दुरुस्ती झालेली नव्हती. त्या दुरुस्तीमुळे गतवेळचा गळीत हंगाम वेळेत सुरू नाही. परंतु, संचालक मंडळाच्या निर्णयानुसार योग्य कामकाज सुरू केले होते. गुजरातमधील एका ट्रस्टकडून कमी व्याजदरात ३०० कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले होते.
मात्र, उपाध्यक्ष चव्हाणांसह पाच संचालकांनी संकुचित हेतूने व कारखाना सुरळीत चालू नये, कारखान्याच्या मशीनरीत सुधारणा होऊ नये, न्यायालयाची मनाई असताना कर्मचाऱ्यांचा संप करणे, कामात व्यत्यय आणणे, अशा असहकाराने हंगाम चालू केला असता मशीनरीत हेराफेरी करून काम होऊ न देण्यासाठी वारंवार सहकार खात्याकडे खोट्या तक्रारी केल्या, त्यामध्ये माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले. गुजरातच्या ट्रस्टकडेही तक्रारी केल्या. यामुळे कर्ज मिळू शकले नाही. या पाच संचालकांच्या वागणुकीमुळे आधुनिकीकरण व नवे प्रकल्प सुरू करणे शक्य होईल, असे वाटत नाही, असे गौप्यस्फोटही राजीनामा पत्रात केले आहेत.
सभासदांचे होणारे नुकसान मी पाहू शकत नाही. सहनही होणार नाही. यापुढे कारखाना सुरळीत चालविला जाईल, असे वाटत नाही. कामगारांचे सर्व कोर्ट ऑर्डर, त्यांचे ८५ कोटींचे देणी या परिस्थितीत देणे शक्य नसल्याने राजीनामा देत आहे, असा खुलासाही शहापूरकर यांनी केला आहे.
पाच संचालकांचा घणाघाती हल्ला
माझ्या घरातच गडहिंग्लज कारखान्याचा जन्म झाला असे म्हणणाऱ्या डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी कारखान्याला कर्जाच्या खाईत नेऊन राजीनामा देणे दुर्दैवी आहे. कारखान्यावर वाईट वेळ आल्यानंतर हिंमतीने तोंड देण्याऐवजी त्यांनी राजीनाम्याद्वारे पळ काढत २५ हजार सभासद, शेतकरी, कामगारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पाच संचालकांनी केला आहे.
मुळात शहापूरकरांना कारखान्याच्या सर्व व्यवहाराबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकमताने दिले होते. तरीही त्यांनी राजीनामा दिल्याचा खेद वाटतो. कारखान्याच्या ऊर्जितावस्थेसाठी सभासदांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकहाती सत्ता दिली. त्याचे भान आम्हा संचालकांना आहे. शहापूरकरांनी पळ काढला तरी आम्ही हिंमतीने कारखाना लवकर व पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन करू. आमच्या प्रयत्नांना पालकमंत्री मुश्रीफ पाठबळ देतील, असा विश्वास आहे, असे या पाच संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शहापूरकरांनी राजीनामा पत्रातून केलेल्या आरोपांचे खंडण सध्याच्या परिस्थितीत करू इच्छित नाही. आरोप-प्रत्यारोपाने हंगाम सुरू करण्यात अडचणी येतात. म्हणून आरोप टाळत आहोत, असे एकीकडे नमूद करताना, शहापूरकरांना कारखान्याच्या हितासाठी प्रत्येक निर्णयात सहकार्याची भूमिका घेतली. केडीसीकडून मिळालेल्या ५५ कोटींच्या कर्जाचा योग्य विनियोग आवश्यक होता. मात्र, एकाही खरेदीची किंवा कामाची निविदा प्रक्रिया न करता सहकार कायद्याची त्यांनी पायमल्ली केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
नूतनीकरणाच्या नावाखाली जुन्या मशीनरी बसविल्या. त्यावरील तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षणही सुरू आहे. त्यात सत्य बाहेर येईलच. केडीसीकडून सुरळीत कर्जपुरवठा असतानाही तीनशे कोटी आणण्याचे सोंग केले. त्यांच्या नियमबाह्य कार्याला कंटाळूनच सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी तक्रार दिली आहे. त्यावर चर्चेसाठी शुक्रवारी (ता. ६) होणाऱ्या संचालकांच्या सभेत आपली बाजू न मांडता, समर्पित उत्तरे न देता निर्माण झालेल्या परिस्थितीपासून ते पळ काढत आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.