राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना सरकारची भेट
मोफत गृहोपयोगी वस्तू आणि शिधावाटप
सोलापूर/बीड: राज्यातील ऊसतोड कामगारांचे कष्टप्रद जीवन सुसह्य करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना सण-उत्सवासाठी मोफत शिधासंच आणि दैनंदिन वापराच्या गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनेचे महत्त्वाचे तपशील
पहिल्या टप्प्यात १ लाख लाभार्थी: एकूण ४ लाख कामगारांपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख कामगारांना या साहित्याचे वाटप होईल, उर्वरित ३ लाख कामगारांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळेल.
बीड जिल्ह्याचा सर्वाधिक वाटा: राज्यात सर्वाधिक ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातील असून, तेथे २५ हजार लाभार्थ्यांना सुमारे २५कोटी रुपयांच्या वस्तूंचे वितरण केले जाणार आहे.
निवडक १० जिल्हे: या योजनेत बीडसह नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर आणि परभणी या १० जिल्ह्यांचा समावेश आहे.
निर्णयाची पार्श्वभूमी
गळीत हंगामादरम्यान ऊसतोड कामगार सहा-सहा महिने घराबाहेर, शेतात झोपड्या बांधून राहतात. त्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे आणि अस्थिर असते. ही परिस्थिती विचारात घेऊन १२ फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संपूर्ण वितरण प्रक्रियेची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यकआयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
या वस्तुंचा आणि पदार्थांचा समावेश
शिधासंचामध्ये दोन किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो पोहे अशा सुमारे ६१० रुपये किंमतीच्या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे.
गृहोपयोगी संचामध्ये असणार ३० वस्तू
ताट चार, वाट्या आठ, पाण्याचे ग्लास चार, पातेले झाकणासह (लहान) एक, पातेले झाकणासह (मध्यम) एक, पातेले झाकणासह (मोठे) एक, मोठा चमचा (भात वाटपाकरीता) नऊ, मोठा चमचा (वरण/भाजी वाटपाकरीता) एक, पाण्याचा जग (दोन लिटर) १०, मसाला डब्बा एक, डब्बा झाकणासह (१४ इंच) एक, डब्बा झाकणासह (१६ इंच) एक, डब्बा झाकणासह (१८ इंच) एक, परात एक, प्रेशर कुकर (पाच लिटर) स्टेनलेस स्टील एक, कढई (स्टील), स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगराळासह एक असे एकूण ३० भांडे समाविष्ट असलेला संच कामगारांना वितरीत करण्यात येणार आहे.






