इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. परंतु बी-हेवी मोलॅसिसपासून नेहमीप्रमाणे इथेनॉल उत्पादन करता येणार आहे. त्याबाबत निर्बंध घातलेले नाहीत.

केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना यासंदर्भात सविस्तर पत्र पाठवले आहे. त्यानुसार बी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलचा पुरवठा तेल विपणन कंपन्यांना सुरूच राहील.

साखर (नियंत्रण) आदेश 1966 च्या कलम 4 आणि 5 अन्वये प्राप्त अधिकारांनुसार, सर्व साखर कारखानदारांना आणि डिस्टिलरीजना हा आदेश देण्यात आला आहे. (इथेनॉल पुरवठा वर्ष) 2023-24 मध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

“बी-हेवी मोलॅसिसकडून ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) प्राप्त झालेल्या विद्यमान ऑफरमधून इथेनॉलचा पुरवठा सुरू राहील,” असे अन्न मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »