हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला ११.२२ कोटींचा दंड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ चा परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचा ठपका साखर आयुक्तालयाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठेवून मोठा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी ११.२२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरण्यात यावी, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी आदेशात म्हटले आहे. गाळप नियमांचा भंग केल्याप्रकरणी बारा कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.

सन २०२५-२६ या हंगामातील ऊस गाळपाला राज्यात १ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस गाळप करण्यासाठी साखर उत्पादकाने साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कारखाना महासंघाचे अध्यक्ष असतानाही त्यांच्या कारखान्याने परवाना मिळण्याआधीच गाळप हंगाम सुरू कसा केला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला २ कोटी ३२ लाख रुपयांचा आणि सांगली जिल्ह्यातील रायगाव शुगर अँड पावर या खासगी कारखान्याला सुमारे ४० लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

गाळप परवाना मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करून गाळप परवाना घेण्याबाबत साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने २० ऑक्टोबरला प्रादेशिक सहसंचालकांकडे ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचे साखर आयुक्तालयाला आढळून आल्याने या प्रकरणी कारखान्याला पाचशे रुपये प्रति टन या प्रमाणे ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. या कारखान्याने २ कोटी २४ लाख २९९ टन उसाचे गाळप केले आहे.

सध्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना हा साखरसम्राट बाबूराव बोत्रे यांच्या ओंकार ग्रुपने चालवण्यास घेतला आहे. कारखान्याचा गळीत हंगाम ३ नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात सुरू झाला होता. यावेळी स्वत: पाटील आणि बोत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कर्मयोगी आणि ओंकार ग्रुपच्या सहयोगाचे नवे मॉडेल देशासमोर उभे राहील, असे उद्‌गार यावेळी पाटील यांनी काढले होते. मात्र या सहयोगाची सुरूवातच नियमांचा भंग केल्याने झालेल्या मोठ्या दंडाने झाली आहे. यासंदर्भात श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क प्रस्थापत होऊ शकला नाही.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप परवाना प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर यांच्यामार्फत २९ सप्टेंबरला ऑनलाइन पद्धतीने पाठवला होता. मात्र, कारखान्याने परवाना मिळण्याआधीच ४६ हजार ४४७ टन उसाचे गाळप केल्याने कारखान्याला २ कोटी ३२ लाख २३ हजार ५०० रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रायगाव शुगर अँड पावर या खासगी कारखान्याने विना परवाना ७ हजार ९८० टन उसाचे गाळप केल्याप्रकरणी ३९ लाख ९० हजार ३८० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »