हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीसाठी एकसमान दर हवा

साखर आयुक्तांकडे ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी
पुणे : हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीसाठी राज्यात एकसमान ऊस तोडणी दर देण्यात यावा, अशी मागणी राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष उमेशचंद्र पाटील (कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळ नुकतेच आयुक्तांना भेटले.
शिष्टमंडळात संघटनेचे सचिव घनश्याम मारकड (सोलापूर), खजिनदार निलेश भुसे (पुणे), उपाध्यक्ष अविनाश सावंत (सातारा), ज्ञानोबा पाटील (सांगली), निलेश बगाडे (पुणे), विशाल मोरे (सांगली) आणि सदस्य शांतगोंडा पाटील यांचा समावेश होता.
बैठकीनंतर माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यात संपलेल्या 2022-23 या ऊस गाळप हंगामात मशीनद्वारे ऊस तोडणीस प्रति टनास 360 ते 420 रुपये दर दिला आहे. तर भुईज (सातारा) येथील किसनवीर सहकारी व फलटण येथील दत्त इंडिया प्रा.लि. या कारखान्यांनी हाच दर प्रति टनास 510 रुपये दिलेला आहे. राज्यभर हाच दर देण्यात यावा.
राज्यात सन 2018-19 ते सन 2022-23 या कालावधीमध्ये राज्यातील शेतकर्यांना शेतीला जोडधंदा म्हणून बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जे घेऊन ऊस तोडणी मशीनची खरेदी केली. त्यातून 40 टक्के अनुदानाचा निर्णय असतानाही 2020 पुर्वीच्या खरेदी करण्यात आलेल्या ऊस तोडणी मशीन मालकांना अनुदानापासून वंचित ठेवले गेले आहे. ते तत्काळ देऊन झालेला अन्याय सरकारने दूर करावा, अशी मागणी आम्ही साखर आयुक्तांकडे केली आहे.
ऊस तोडणी मशीनच्या सहाय्याने तोडणी केलेल्या उसाच्या वजनात साखर कारखाने 4.5 टक्क्यांइतके वजन कपात करतात. ही कपात ऊस तोडणी मशीन व्यवसायिकांवर अन्याय करणारी आहे. ही कपात 4.5 टक्क्यांवरुन कमी करुन 2 टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.