९५ हार्वेस्टर खरेदीची प्रक्रिया पूर्ण
पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ९५ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच जणांच्या बँक खात्यावर सुमारे पावणेदोन कोटींचे अनुदान नुकतेच जमा करण्यात आले आहेत.
हार्वेस्टर यंत्र अनुदान प्रकल्पांतर्गत साखर आयुक्तालयाने ३७३ अर्जदारांना ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आल्यानंतर त्यापैकी ९५ यंत्रांची खरेदी पूर्ण झाली आहे. योजनेत कृषी विभागाकडून प्राप्त निधीच्या मर्यादित प्राथमिक स्वरूपात पाच ऊसतोडणी यंत्रधारक लाभार्थ्यांच्या बँक कर्ज खात्यात एकूण १ कोटी ६९ लाख ७५ हजार ३१ रुपयांइतके अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.
सर्वसाधारण प्रवर्गातील पाच लाभार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील एक आणि चार अहमदनगरमधील आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊसतोडणी यंत्रांना अनुदान या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर राज्यातून वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांच्याकडून एकूण ९ हजार १८ अर्ज प्राप्त झाले आहेत. ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पासाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जाची राज्यस्तरावर संगणकीय सोडत काढण्यात यावी, असे साखर आयुक्तालयाने कृषी विभागास कळविले होते.
या प्रकल्पास आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता ९६ कोटी ३९ लाख रुपयांइतका अतिरिक्त अनुदान निधी मंजूर आहे. कृषी विभागाकडून उर्वरित अनुदान मिळताच अन्य ऊसतोडणी यंत्रणा अनुदान दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.