‘पंचगंगा’बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

फेरनिवडणुकीला दिली स्थगिती
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या फेरनिवडणुकीला नुकतीच उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा या कारखान्याची निवडणूक होणार की, यापूर्वी बिनविरोध झालेल्या निवडीवरच शिक्कामोर्तब होणार, याकडे सभासदांसह सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ ते २०२९-३० या पंचवार्षिक निवडणुकीची ५ डिसेंबर २०२४ रोजी सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने घोषणा केली होती. त्यानुसार सामान्य उत्पादक सभासदांच्या १२, महिला २, ब वर्ग व्यक्ती गट एक, ब वर्ग संस्था एक आणि मागासवर्गीय प्रवर्ग एक अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १९ जानेवारी रोजी जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. तसा अहवाल प्राधिकरणाला सादर करण्यात आला. २४ जानेवारी रोजी प्राधिकरणाकडून याची अधिकृत घोषणा केली जाणार होती. दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेविरुद्ध विरोधी गटाने न्यायालयात दाद मागितली होती.
निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आलेली नाही. सूचक आणि अनुमोदक यांचा सलग चार वर्ष ऊस कारखान्याला जाणे बंधनकारक आहे. अन्य कारखान्यात त्यांनी तो पाठवता कामा नये, तसेच सलग तीन सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. छाननी प्रक्रियेत या नियमांची योग्य पडताळणी झालेली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणारी होती. याच दरम्यान बिनविरोध निवडणूक स्थगितीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले त्यावर सुनावणी होऊन प्राधिकरणाने फेरनिवडणुकीच्या दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत शुक्रवारी स्थगिती दिली. याबाबतचा आदेश मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी यांनी दिली.