दमदार पावसाने ऊस उत्पादक सुखावला

निपाणी परिसरात तब्बल ४० मिनिटे मुसळधार पाऊस ; १७ मि.मी.ची नोंद
निपाणी : तुफान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात तब्बल ४० मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने निपाणी शहर परिसराला बुधवारी अक्षरशः झोडपून काढले. कृषी संशोधन केंद्रातील पर्जन्यमापकावर १७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ऊस पिकाला उपयुक्त ठरल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र सुखावला आहे. पावसामुळे काहीअंशी हवेत गारठा निर्माण झाल्याने उन्हाने लाहीलाही झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाल्याचे चित्र होते.
मार्चपासून या परिसरात उन्हाची तीव्रता सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत वारंवार वळवाने या परिसराला हुलकावणी दिली होती. मात्र, बुधवारी रात्री अचानक मेघ दाटून येत पावसाने दमदार सलामी दिली. त्यामुळे काहीअंशी हवेत गारठा निर्माण झाला आहे.
सध्या शिवारातील रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी व मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यामध्ये शेतकरी ऊस पिकाला रासायनिक व शेण खताची मात्रा देण्यात गुंतला आहे.
ऊस पीक भरणीची कामेही सुरू आहेत. कडक उन्हामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. वळीव पावसामुळे काही अंशी उसाला पोषक ठरले आहे. या महिन्यात आतापर्यंत दोनवेळा वळीव झाला असला तरी बुधवारचा पाऊस दमदार झाला. या पावसामुळे हेस्कॉमचेही काही प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा तासभर खंडित करावा लागला होता.