इथेनॉलसाठी उसाचा रस, साखर पाक वापरावर बंदी
इथेनॉलसाठी उसाचा रस, साखर पाक वापरावर बंदी

साखरेच्या चढ्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारचे पाऊल
नवी दिल्ली | शुगरटुडे
देशांतर्गत बाजारात साखरेचे वाढते दर आणि घटत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी २०२६-२७ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी काढलेल्या नव्या निविदेतून उसाचा रस, साखर पाक आणि बी-हेवी मोलॅसेसपासून बनणाऱ्या इथेनॉलला वगळले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे. त्यामुळे साखरेचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. देशातील गरज भागवण्यासाठी साखर वाचवणे आणि त्याच वेळी तेल आयात कमी करण्यासाठी इथेनॉल कार्यक्रम सुरू ठेवणे, असा दुहेरी समतोल सरकार साधण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने १६ ऑक्टोबर रोजी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने ही निविदा काढली आहे. नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या वर्षासाठी सुमारे ११०० कोटी लिटर (११ अब्ज लिटर) इथेनॉल खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशभरात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (ई २०) करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही खरेदी आहे.
निविदेत स्पष्ट म्हटले आहे की, “भारत सरकारने २०२६-२७ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉलसाठी साखरेचा वापर शून्यावर आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उसाचा रस, साखर, साखर पाक आणि बी-हेवी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी कोणत्याही ऑफर मागवण्यात आलेल्या नाहीत.”
आता इथेनॉल कशापासून बनणार?
सरकारने साखर-आधारित इथेनॉलला ब्रेक लावला असला तरी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम थांबणार नाही. त्यासाठी पर्यायी कच्चा माल वापरला जाणार आहे.
नव्या निविदेनुसार, आता तेल कंपन्या पुढील पदार्थांपासून बनलेले इथेनॉल खरेदी करणार आहेत –
- मका
- तुटलेला तांदूळ आणि अन्न महामंडळाकडून (एफसीआय) मिळणारा अतिरिक्त तांदूळ
- खराब झालेले धान्य
- सी-हेवी मोलॅसेस – हा उसापासून साखर काढल्यानंतर उरणारा अंतिम उप-पदार्थ (मळी) आहे, यात साखरेचे प्रमाण कमी असते.
मका उत्पादकांना धक्का
सरकारने याच निविदेत मक्यापासून बनणाऱ्या इथेनॉलवरील प्रोत्साहन रक्कमही कमी केली आहे. आधी मक्याच्या इथेनॉलवर ५.७९ रुपये प्रति लिटर प्रोत्साहन मिळत होते, ते आता २.७९ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे खरेदी दर ७१.८६ रुपयांवरून ६८.८६ रुपये प्रति लिटरवर आला आहे.
—-xx—-






