‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली.
विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांचा ‘सह्याद्री’ हा आधीपासूनच भक्कम होताच. मात्र, या विजयाने आता तो अभेद्य झाला आहे. विरोधकांच्या अति महत्वकांक्षा हे त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या तर बाळासाहेबांच्या संयमाचा हा विजय झाला. तिरंगी लढतीमुळे विरोधकांएवजी सैरभैर झालेले सभासदही बाळासाहेब पाटील यांच्याच पाठीशी उभे राहिले.
भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह निवास थोरात, धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या दोन्ही पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्र्याचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेच पाटील यांचे राजकारण संपले असा सुर उमटत असतानाच ‘सह्याद्री’च्या माध्यमातून त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले.
विरोधकांची अति महत्वकांक्षा सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर
या निकालामुळे बाळासाहेब पाटील यांना राजकीय नवसंजीवनी मिळाली आहे. कराड उत्तरच्या राजकारणात बाळासाहेब पाटील यांना वजा करून चालणार नाही, असाच इशारा या निमित्ताने पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.
यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक तब्बल २७ वर्षानंतर ताकदीने लढली गेली. कारखाना कार्यक्षेत्रातील कराडसह कोरेगाव, सातारा, कडेगाव व खटाव या पाच तालुक्यांतील ३२ हजार २०२ मतदारांपैकी २६ हजार ९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सह्याद्री कारखान्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली.
यामध्ये प्रामुख्याने माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील व भाजपाचे जिल्हाअध्यक्ष धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली होती.
मुळात नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी पराभव केला. थोडा थोडा नव्हे तर ४४ हजार मतांच्या लीडने… मनोज घोरपडे आमदार झाले. घोरपडे यांना आमदार करण्यासाठी उत्तरच्या भाजपने खस्ता खाल्ल्या, जिल्हाध्यक्ष चैर्यशील कदम, किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपच्या पद्यधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा गढ़ भाजपने उद्ध्वस्त केला. या निवडणुकीच्या निकालातच सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीची ‘बीजे’ रोवली गेली.
पंचवीस वर्षे सलग आमदार असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांचा पराभव होऊ शकतो, हे या निवडणुकीत पुढे आल्याने विरोधकांनी विधानसभेत केलेली एकी ‘सह्याद्री’साठी कायम ठेवत सह्याद्री कारखाना देखील ताब्यात घेण्याचे ‘मनसुबे’ आखले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना ‘बळ’ मिळाल्याने सह्याद्री कारखान्यासाठी त्यांच्या महत्वकांक्षा अधिक वाढल्या गेल्या. सत्तेचे महत्त्व वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि हेच मतभेद बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडले.
शेवटी तिरंगी लढतीची स्थिती
विरोधकांमध्ये असणारी एकी अर्ज माघारीपर्यंत कायम होती. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांच्यामध्ये न जुळल्याने ‘सह्याद्री’साठी तिरंगी लढत निश्चित झाली. यातही राजकीय घडामोडी घडत आमदार मनोज घोरपडे यांना काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी ‘हात’ दिला तर तिकडे माजी जिल्हा परिषद सदस्य व पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू निवास थोरात यांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांना बरोबर घेत ‘सवता सुभा’ मांडला.
दरम्यान, निवास धोरात यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने याचे खापर त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्यावर फोडले आणि विरोधकांमधील दरी अधिकच रुंदावत गेली. आ. मनोज घोरपडे व निवास थोरात यांनी ‘सह्याद्री’चे रान तापण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार करत एकमेकांवर राजकीय हल्ले केले. तसेच सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. आक्रमक प्रचारामुळे एकीकडे निवडणुकीत रंगत वाढवण्याचे काम सुरू असतानाच तिकडे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा संयम महत्त्वाचा ठरला.
बाळासाहेब पाटील यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. बाळासाहेब पाटील यांचे राजकारण संपले असा सूर कराड उत्तरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर उमटू लागला होता. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी पराभवातून खचून न जाता पुन्हा जोमाने व संयमाने काम सुरू केले, मुळात प्रत्येक निवडणुकीची गणिते वेगळी असतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचा सह्याद्री कारखान्यावर काहीही परिणाम होणार नाही याची जाण बाळासाहेब पाटील यांना होती.
आधीच ‘सह्याद्री’मध्ये बाळासाहेब पाटलांचा गट भक्कम, तरीही तो गट पुन्हा बांधण्याचे काम पाटील यांनी सुरू केले. यहा वर्षांपूर्वी सह्याद्री कारखान्यात निवडणूक लागली खरी, मात्र ती काही जागांवरच मर्यादित होती. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती.
मात्र, बाळासाहेब पाटील यांचा ‘सह्याद्री’ हा आधीपासूनच भक्कम होताच, मात्र, या विजयाने आता तो अभेद्य झाला आहे. विरोधकांच्या अति महत्वकांक्षा हे त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या तर बाळासाहेबांच्या संयमाचा हा विजय झाला. बाळासाहेब पाटलांचा हा विजय भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
साभार : पुण्यनगरी