साखर उद्योगासाठी आणलेल्या हिंदी लोकांनी केले फिजीचे परिवर्तन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या वाचकप्रिय सदरातून. या सदरात ते लिहिताहेत, साखर उद्योगाचा मानवी स्थलांतरावरील प्रभाव… भारताच्या संदर्भाने ही मालिका असेल, ती नक्कीच सर्वांना आवडेल – संपादक

फिजीमधील सुरुवातीचे भारतीय गिरमिटियन्स

Girmitians of FIJI

‘फिजीचे प्रजासत्ताक’ हा देश दक्षिण प्रशांत महासागरात ओशिनिया खंडातील मेलेनेशिया भागातील एक देश आहे. ३३२ बेटे असलेल्या या देशाच्या द्वीपसमूहातील ११० बेटांवर लोक वस्ती आहे. व्हिटिलेवू व व्हानुआ लेवू ही प्रमुख बेटे आहेत. १९७० साली हा देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. राजधानी सुवा व्हिटीलेवू बेटावर वसली आहे. ७५ टक्के लोकसंख्या ही सुवा महानगराच्या परिसरात वास्तव्याला आहे. ओशिनिया या खंडातील, प्रशांत महासागरातील सर्वात विकसित अर्थव्यवस्था या देशाची आहे. समृद्ध वन, खनिज आणि मासेमारी निगडित संसाधने आहेत. चलन फिजीयन डॉलर आहे. २०१३ साली लोकसंख्या ८.६८ लाख होती त्यातील ३८ टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आहे १९४२ साली लोकसंख्या २.१ लाख होती त्यापैकी ९४ हजार भारतीय वंशाची लोकसंख्या होती.

अधिकृत भाषा – इंग्लिश, फिजीयन, फिजी-हिंदी,

क्षेत्रफळ १८.२७४ कि.मी. भारतापासून सुमारे १२००० किलोमीटर अंतरावर हा देश आहे.

येथे ब्रिटिशांची अधिकृत राजवट ऑक्टोबर १८७४ साली सुरू झाली. सर आर्थर गार्डन हा १८७५ साली फिजीचा गव्हर्नर झाला. त्याने तेथे पूर्वीच्या कापसाच्या मळ्याऐवजी उसाचे मळे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि उसाच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी कराराने कामगार हिंदुस्थानातून आणण्याचा निर्णय घेतला.

१८७९ ते १९१६ या३६ वर्षांच्या दरम्यान कराराद्वारे ६०९६२ मजुरांना पूर्व आशियामधून आणण्यात आले. त्यापैकी १५१३२ भारतीय मजूर फिजीत आणण्यात आले. एकूण आणलेल्या मजुरांपैकी त्यांची संख्या २५% इतकी होती. त्यांना ‘भारतीय गिरमिटियन्स’ असं म्हटलं जात होतं. बहुतांशी हे मजूर मध्यपूर्व भारत, उत्तर प्रदेश, बिहार या भागातील कराराने आणलेले मजूर होते. त्यासाठी ब्रिटिश साम्राज्यामध्ये १८३७ सालापासून अस्तित्वात आणलेली ‘करारबद्ध कामगार योजना’ चा आधार घेण्यात आला.

भारताच्या कलकत्ता (आताचे कोलकाता), दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भागात विविध शेती क्षेत्रात ग्रामीण भरती कार्यालय या अनुषंगाने स्थापन करण्यात आली. १४ मे १८७९ रोजी कामगार वाहतूक जहाज ‘लिओनिडास’ कलकत्ता येथून लेवुका येथे उतरले. पहिल्या जहाजात ४९८ करारबद्ध कामगार होते. ते पुढील ३७ वर्षात दक्षिण आणि पूर्व आशियातील आलेल्या ६१ हजाराहून अधिक काम गारांपैकी पहिले होते.

करारबद्ध मजुरांच्या करारांना ‘गिरमिट करार’ म्हणत. त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी फिजीमध्ये काम करावे लागत होते. बहुतेक गिरमिटियन्स ऊस मळ्यावर काम करायचे. तेथे राहणीमानाचा दर्जा खराब होता. ‘कुली लाइन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोऱ्यांनी संपूर्ण भाग व्यापला होता. ते वेगवेगळ्या प्रदेशांमधून गावांमधून आणि पार्श्वभूमीतून आणि अनेक जातींमधून आले होते. जे नंतर एकमेकांमध्ये मिसळले आणि त्यांची मिश्र संस्कृती उदयास आली. त्यांना फिजीयन्स इंडो अशी ओळख निर्माण झाली गुलामगिरीची ही नवीन कायदेशीर पद्धत होती. १९१६ साली करारबद्ध कामगारांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत रोष वाढू लागला आणि ही योजना रद्द करण्यात आली. १ जानेवारी १९२० रोजी सर्व करारबद्ध कामगारांना करारातून मुक्त करण्यात आले.

८५ टक्के भारतीय कामगार हिंदू

फिजीमध्ये करारबद्ध कामगार म्हणून आणलेले जवळपास ८५% भारतीय वंशाचे लोक हिंदू होते. त्याशिवाय मुस्लिम, भारतीय ख्रिश्चन, आणि शीखसुद्धा होते. हे करारबद्ध कामगार

गरीब, दुष्काळातून, गरिबीतून बहुतांशी आणले गेले होते. एक चतुर्थांश स्थलांतरित दक्षिण भारतातून मुख्यत्वे तामिळनाडूतून आले होते. तर उर्वरित ७५ टक्के बिहार, झारखंड हरियाणा, पंजाब मधून आले होते. काही गुजरात मधूनही मजूर येथे आले होते.

फिजीमधील अनेक करारबद्ध कामगारांनी त्यांचा करार संपल्यानंतर भारतात परतणे पसंत केले. १९४० पर्यंत ४०% कामगार परत आले. १९२० साली कराराने कामगार आणण्याची प्रथा रद्द केल्यानंतर भारतीय कामगार विविध कारणांमुळे फिजी सोडत राहिले. तेथील उसाच्या मळ्यांसाठी कामगार टंचाईची परिस्थिती गंभीर बनली. यास्तव १९२९ साला मध्ये भारतीयांचं स्थलांतर रोखण्यासाठी ब्रिटिश वसाहतवादी सरकारने इंडो-फिजीयन्स लोकांना निवडणूक आणि काही नागरिक हक्क दिले. वंश कोट्यावर आधारित हे नागरिक हक्क होते.

या व्यवस्थेला हिंदू फिजीयन्स लोकांनी विरोध केला आणि गांधीजींचे सहकारी ए. डी. पटेल यांनी फिजीमध्ये स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. १९७० मध्ये ब्रिटिश साम्राज्याने फिजीला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारतीयांना फिजीयन्स म्हणून समान वागणूक देण्यात आली. १९७६ सालच्या फिजीच्या जनगणनेनुसार २.९५ लाख लोक इंडो फिजिशियन वंशाचे होते.

१९८० च्या दशकात विविध कारणांनी इंडो फिजिअन्स लोकांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, कॅनडा आणि भारतात स्थलांतर केले. ५० हजार लोक त्या काळात स्थलांतरित झाले. त्यामुळे २०१७ साली २.९५ लाख म्हणजे २४% लोक इंडो- फिजिशियन्स राहिले.

Loutaka sugar Mill Fiji
Loutaka sugar Mill, Fiji

साखर उद्योग

फिजी मधील साखर उद्योग हा फिजीच्या अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ आहे आणि महत्वाच्या निर्यातीचा मुख्य स्रोत आहे. फिजीमध्ये ऊस जंगली पद्धतीने पिकत असे आणि फिजीवासी त्यांच्या घरासाठी bures गवत म्हणून वापरला जाई. १८७० मध्ये कापसाच्या किमती घसरल्यानंतर बागायतदार उसाच्या शेतीकडे वळले. त्यावरील आधारित साखर उद्योग १८७० च्या दशकात सुरू झाला. १८७१ साला मध्ये काकोबाऊ सरकारने जानेवारी १८७३ पूर्वी लावलेल्या उसापासून वीस साखरेच्या पहिल्या आणि सर्वोत्तम पीकासाठी ५०० पौंड बक्षीस देऊ केले. अशा सरकारी प्रोत्साहानामुळे उसाच्या शेतीत वाढ झाली.

फिजीमधील पहिला ऊस साखर कारखाना १८७२ साला मध्ये ब्रुस्टर आणि जोस्के यांनी राजधानी सुवा येथे सुरू केला. १८७४ साला अखेरीस चार शुगर मिल कार्यरत होत्या. १८७८ साला पर्यंत त्या दहा झाल्या; परंतु बहुतेक मिल्समध्ये फक्त काही वर्षांसाठी गाळप झाले. १८८४ च्या साखरेच्या किमतीतील घसरणीतून काही मोजक्याच मिल वाचल्या. नवुआ, पनंग, तवेनी आणि रेवा शुगर कंपनी या त्या गिरण्या होत्या.

१८८० साला मध्ये कॉलनीयल शुगर रिफायनरी (CSR) हा ऑस्ट्रेलियन मालकीचा साखर उद्योग नावारूपास आला. सध्या तो सरकारी मालकीच्या फिजी शुगर कॉर्पोरेशन (FSC) द्वारे व्यवस्थापित केला जातो. या कंपनीच्या रेवा नदीच्या काठावर नौसोरी शुगर मिल होती, (१८८२), रारावई (बा येथे), (१८८३) आणि १८९० सालामध्ये क्विन्सलँड मधील एका मोडकळीस आलेल्या गिरणीतून लबासा मिलची उभारणी करण्यात आली. १९२६ पर्यंत सर्व साखर कारखाने बंद पडले आणि फिजी मधील पाच विद्यमान साखर कारखान्यांचे मालकी हक्क CSR कडे होते. त्यापैकी नौसारी मिल १९५९ साला मध्ये बंद झाली..

१८८२ मध्ये सी. एस. आर. मुळे फिजीमधील साखर उद्योग व्यवसायिक दृष्ट्या सक्षम झाला. १९७० सालानंतर या उद्योगाचा लक्षणीय विस्तार झाला. सध्या फिजी शुगर कार्पोरेशन ही फिजीमधील सरकारी मालकीची शुगर मिल कंपनी आहे. ती १९७२ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे स्थापना स्थापित झाली व १९७३ मध्ये अधिकृत अस्तित्वात आली.

एफएससी मध्ये सरकारद्वारे नियुक्त केलेले संचालक मंडळ असते आणि ते मंडळ धोरण ठरवते आणि प्रशासनिक मंडळ म्हणून काम करते त्याचे व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रामुख्याने फिजीचे नागरिक करतात. यामध्ये कच्च्या साखरेच्या उत्पादनावर मक्तेदारी आहे, ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक संस्था आहे. यात १८०० लोक रोजगार देतात. तर फिजीच्या ग्रामीण ऊस पट्ट्यांमध्ये आणखी दोन लाख किंवा त्याहून अधिक लोक त्याच्यासाठी गिरणीवर अवलंबून आहेत. फिजी शुगर कार्पोरेशन एकूण चार साखर कारखाने चालवते.

१९ व्या शतकातील स्थलांतर

जातीचे नावजातीतील लोकांची एकूण संख्याटक्केवारी
चामारस६,०८७१६.९१ %
मुस्लिम५,४५५१५.१५ %
अहिर४,१९७११.६६ %
ठाकूर३,४१६९.४९ %
कुर्मी२,३०७६.४१ %
कोरी१,९४२५.४ %
ब्राह्मण१,५३५४.२६ %
कहार१,५००४.१७ %
खत्री१,१८२३.२९ %
पासी९९९२.७८ %
कोएरी७४०२.०६ %
लोढा७३५२.०४ %
जाट७०८१.९७ %
गदरिया६९२१.९२ %
केवट६५६१.८२ %
राजपूत६५२१.८१ %
पठाण५८४१.६२ %
मुसव५५३१.५४ %

गिरमिटीयन्स

१९५६ मध्ये फिजी देशात भारतीय भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या खालीलप्रमाणे होती.

भाषासंख्याटक्केवारी
हिंदुस्थानी (फिजी-हिंदी मिश्र भाषा)१७,१६४६४.९ %
हिंदी३,६४४१४ %
तेलगू१४९८३.८ %
उर्दू१२२३४.७ %
गुजराती८३०३.२ %
तमिळ७९७३.१ %
गुरुमुखी४६८१.८ %
मल्याळम१३४०.५ %
इतर२७३१ %
एकूण२६,०३११०० %

लौटाका मिल बा जिल्ह्यातील रारावाई मिल. रकीराकी येथील पेनांग मिल आणि वानुआ लेवू मधील लबासा मिल येथील मिल फिजी मधील सर्वात मोठी साखर गिरणी आहे. उत्पादित ९०% पेक्षा जास्त साखर उत्पादन निर्यात केले जाते. १९८४ सालच्या साखर उद्योग कायद्याने शेतकऱ्यांच्या हिताचे नियमन, निर्णयआणि प्रतिनिधित्व करण्यासाठी अनुक्रमे फिजीचा साखर आयोग, साखर उद्योग न्यायाधीकरण आणि साखर ऊस उत्पादक परिषद स्थापन झाली.

इंडियन केन ग्रोअर्स असोसिएशन

फिजीमधील पहिली ऊस उत्पादक संघटना १९१९ सालामध्ये स्थापन झालेली इंडियन केन ग्रोअर्स असोसिएशन होती. त्यांनी १८८० साला मध्ये स्थापन झालेल्या प्रमुख ऊस लागवड आणि कच्च्या साखर उत्पादन कंपनी कॉलनीय शुगर रिफायनिंग कंपनीशी वाटाघाटी केल्या. १९२१ साला मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संप हा वशिष्ठ मुनी यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. १९५९ सालामध्ये ऊस उत्पादक संघाची स्थापना झाली व १९८० सालामध्ये ऊस उत्पादक संघटनांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली.

आर्य समाजाचा प्रभाव आणि गिरमिटियन्स डे

उसाच्या शेतीसाठी कराराने हिंदुस्तानातून आणलेल्या लोकांचे पहिले जहाज १४ मे १८७९ रोजी फिजीच्या किनाऱ्यास लागले. त्यामुळे १४ मे हा दिवस फिजीमध्ये * गिरमिटियन्स डे* म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी देशात सार्वत्रिक सुट्टी दिली जाते. भारतीयांनी फिजी दे-शाची उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा स्मरण त्यादिवशी केलं जातं. हे गिरमिटियन्स कालांतराने विविध उद्योगांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारामध्ये देखील स्थिरावले. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

फिजीमध्ये आलेल्या गिरमिटियन्स पैकी बहुतांशी लोक हिंदू धर्मातील सनातन धर्मपंथाचे तसेच आर्य समाजाचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि महागड्या विधींपासून स्वतःची मुक्तता करून घेतली. बालविवाहास विरोध केला आणि विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन केले. मुलींच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले.

फिजी समाचार

आर्य समाजाने येथे शाळा स्थापन केल्या. १९२३ मध्ये ‘फिजी समाचार’ या त्यांच्या प्रमुख वृत्तपत्राद्वारे हे ते काम करत. गिरमिटीयन्सच्या पुढील पिढ्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला. ए. डी. पटेल यांनी स्थापन केलेला नॅशनल फेडरेशन पार्टी हा देशाच्या इतिहासातील बहुतेक काळात इंडो – फिजीशियन समुदायाचा लोकप्रिय पक्ष होता. कालांतराने या पक्षाला जागा कमी मिळाल्या आणि इंडो फिजिशियन पूर्वी ज्या पक्षाला पसंती देतो त्या फिजी लेबर पार्टी, ज्याचे नेतृत्व महेंद्र चौधरी करत होते, तो पक्ष १९९९ मध्ये सत्तेत आला. १९ मे १९९९ रोजी महेंद्र चौधरी हे फिजीचे चौथे व इंडो- फिजीयन समूहातून आलेले पहिले पंतप्रधान बनले.

१९८७ च्या लष्करी उठावानंतर इंडो फिजीयन समुहाला स्थानिक फिजीयन ख्रिश्चन समूहातून झालेल्या विरोधानंतर उच्चशिक्षित इंडो- फिजीयनच्या पिढ्यांनी ऑस्ट्रेलिया, ओशिनिया, ग्रेट ब्रिटन अमेरिका, कॅनडा व जगात सर्वत्र जमेल तिथे स्थलांतरण केले सुमारे ५०००० लोकांनी हे स्थलांतर केले आणि आपली इंडो फिजीयन संस्कृती त्यांनी त्या देशातही नेली.

हा फिजीमधील ‘ब्रेन ड्रेन’ समजला जातो. केवळ उसाच्या शेतीसाठी फिजी देशात येऊन तेथील संपूर्ण समाजकारण, राजकारण आणि वांशिक समीकरण या भागात बदलले आहे. देशाची उभारणी करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात इंडो फिजीयन समूहाने योगदान दिले आहे. ही सगळी उलथापालथ झाली ती उसाच्या शेतीपायी व त्यातून निघणाऱ्या गोड साखरेमुळे हे विसरता येणार नाही. (क्रमशः)

Fiji's 4th PM Mahendra Choudhari
महेंद्र चौधरी- फिजीचे चौथे पंतप्रधान

उल्लेखनीय इंडो फिजीयन व्यक्तिमत्त्वे
जॉय अली- बॉक्सर, ज्युनियर फरजान अली बॉक्सर, शबाना अजीज – ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, गणेश चंद- शैक्षणिक इतिहासकार, राजकारणी आणि जाझ संगीतकार, राजेश चंद्रा- फिजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि दक्षिण पॅसिफिक विद्यापीठाचे अध्यक्ष, महेंद्र चौधरी- फिजीचे चौथे पंतप्रधान, इमराणा जलाल – युनो मानवाधिकार सल्लागार व आंतरराष्ट्रीय न्याय तज्ज्ञ आयोगाच्या सदस्या,
रॉकी खान – न्यूझीलंडचा रग्बी सेव्हन्स खेळाडू, रॉय कृष्णा फुटबॉल खेळाडू, स्वातंत्र्यानंतर फिजीच्या संसदेतील पहिले विरोधी पक्ष नेते सिद्दिक मोईद्दीन कोया राजकारणी आणि प्रख्यात वकील, ब्रिजलाल इतिहासकार, प्रेरणालाल अमेरिकेतील वकील आणि नागरी हक्क वकील, शनील लाल – आदिवासी हक्क कार्यकर्त्या, शिरीन लतीफ – महिला हक्क कार्यकर्त्या,
जेम्स माधवन फिजीचे सर्वात जास्त काळ संसद सदस्यांपैकी एक, जुलियन मोती – सॉलोमोन बेटांचे माजी अॅटर्नी जनरल, सत्य नंदन पश्चिम मध्य पॅसिफिक मत्स्यपालन आयोगाचे अध्यक्ष, राजेन प्रसाद – न्यूझीलंडचे माजी खासदार, जॅक राम- इंडो फिजिशियन वंशाचा टोंगन रग्बी खेळाडू, जयराम रेड्डी फिजीतील माजी विरोधी पक्ष नेते, सर आनंद सत्यानंद २००६ ते २०११ न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल,
अय्याज सय्यद खय्यूम -फिजीचे अॅटर्नी जनरल, फैजा शाहीन ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, – नजत शमीम UNHRC अध्यक्ष, विवेकानंद शर्मा – माजी युवा आणि क्रीडामंत्री, सनातन धर्माचे माजी अध्यक्ष, रेडिओ फिजीचे माजी संचालक, रेखा शर्मा कॅनडियन अभिनेत्री, अजित स्वरणसिंग – न्यूझीलंडमधील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश,
बॉबी सिंग – निवृत्त व्यावसायिक अमेरिकन आणि कॅनडियन फुटबॉल गार्ड, लिसा सिंग ऑस्ट्रेलियन सिनेटर, नलिनी सिंग अलौकिक प्रेम कथा लेखिका, विजय सिंग – माजी जागतिक नंबर वन गोल्फपटू, ब्रिटनमध्ये स्थलांतर झालेली गायिका तनिका टीकाराम, बेन व्होलाओला रग्बी युनियन खेळाडू.

FIGI Girmitians
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »