FRP वाढीचे स्वागत, आता साखरेची MSP ४२०० करा: WISMA

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारने साखरेची एम एस पी सुद्धा वाढवणे आवश्यक आहे , अशी आग्रही मागणी WISMA ने केली आहे.
केंद्रीय कृषी मूल्य आयोग, ज्यांच्या शिफारशीवरून केंद्र सरकार ऊसाची एफ आर पी वाढवते त्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक वर्षीच्या आपल्या रिपोर्ट मध्ये एफ आर पी वाढवत असताना त्या प्रमाणामध्ये साखरेची एम एम एस पी सुद्धा वाढवणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे . मात्र केंद्र सरकार एफ आर पी चा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एम एस पी कडे दुर्लक्ष करते, अशी खंत व्यक्त करून विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत . एफ आर पी ची किंमत गेल्या सहा वर्षात दरवर्षी वाढवली गेली, मात्र गेल्या सहा वर्षात साखरेची एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत एकदाही वाढवली नाही.
ज्यावेळेस ऊसाची एफ आर पी 2750 रुपये प्रति टन होती त्यावेळेस साखरेची किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी 2900 रुपये होती. त्यानंतर फक्त एक वेळेस एमएसपी मध्ये वाढ करून 3100 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली. त्यानंतर 2019 पासून एमएसपी मध्ये वाढ झालेली नाही . आज ही साखरेची एमएसपी 3100 आहे व ऊसाची एफ आर पी मात्र आता 3550 रुपये झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या एफ आर पी प्रमाणे उसाची किंमत अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते व एफआरपी अदा करणे अपरिहार्य राहते. त्यामुळे आज साखर कारखान्यांच्या कडील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे व संचित तोट्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
त्यासाठी विस्मा च्या वतीने केंद्र सरकारला आमची एकच विनंती आहे कृषी मूल्य आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एफ आर पी ज्या प्रमाणात वाढवली जाते त्या प्रमाणात एम एस पी वाढ जाहीर करण्यात यावी. आज गेल्या सहा वर्षातील एम एस पी वाढीतील फरक व आज प्रती क्विंटलचा उत्पादन खर्च लक्षात घेता आज साखरेची एमएसपी किमान 4200 रुपये प्रतिक्विंटल होणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत विस्माने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे साखर उद्योगाची व्यथा मांडली आहे.
सध्या थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती मुळे साधारण प्रत्येक साखर कारखान्यात उसाचा वापर 25% पर्यंत इथेनॉल निर्मितीकडे वळलेला आहे .त्यामुळे इथेनॉलची सुद्धा किंमत ही एफआरपी किमतीच्या वाढीशी निगडित करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज 60 रुपये प्रति लिटर असणारी बी मोलासेस पासूनच्या इथेनॉल ची किंमत किमान 70 रुपये प्रति लिटर होणे आवश्यक आहे. तरच साखर कारखान्याच्या प्रति लिटर इथेनॉलचा उत्पादन खर्च निघेल . म्हणून विस्माच्यावतीने आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की तातडीने साखरेची एम एस पी 4200 रुपये प्रतिक्विंटल व इथेनालची किंमत 70 रुपये प्रति लिटर करून वाढीव एफ आर पी बरोबर या दोन्ही निर्णयाची घोषणा तातडीने करावी तरच देशातील साखर उद्योग जिवंत राहील अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी सशक्त करण्याच्या प्रयत्नात त्याचा मुख्य गाभा असणारा साखर कारखाना मात्र नेस्तानाबूत होईल व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा प्रचंड अडचणीमध्ये येईल याचे भान केंद्र सरकारने ठेवणे आवश्यक आहे, याकडेही WISMA ने सरकारचे लक्ष वेधले आहे..