साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवा

आदिनाथ चव्हाण यांची राज्य अन् केंद्र सरकारकडे मागणी
पंढरपूर : साखर विक्रीची आधारभूत किंमत अद्याप वाढली नसल्याने राज्यातील सुमारे ६० ते ७० साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवावी. ती प्रतिकिलो ६० रुपये करून साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देशात २० कोटीपेक्षा अधिक शेतकरी उसाचे उत्पादन घेतात. वाढत्या महागाईमुळे ऊस शेती तोट्यात आली आहे. उसाच्या एफआरपीत सातत्याने वाढ होत असली तरी, साखर विक्रीची किंमत मात्र ‘जैसे थे’ आहे. मागील पाच वर्षांत १०० किलो उसाला फक्त पाच रुपयांची वाढ केली आहे. तर मध्यंतरी केंद्र सरकारने त्यामध्ये १५ रुपयांची वाढ केली आहे. सध्या साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत ही प्रतिक्विंटल ३१०० रुपये इतकीच आहे. उत्पादन होणाऱ्या साखरेपैकी ८५ टक्के साखर ही खाद्यपदार्थ किंवा इतर चीजवस्तू निर्मितीसाठी वापरली जाते. मिठाई उद्योगासाठी व्यापारी चढ्या भावाने साखरेची विक्री करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीची किमती प्रतिक्विंटल सहा हजार रुपये करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या राज्य आणि केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.