शेतकऱ्याला समग्र संरक्षणाची गरज : डॉ. मुळीक

डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्टचे उद्घाटन
पुणे : शेती अत्यंत बेभरवशाची असल्याचे हजारो वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवून, शेतकऱ्यांना समग्र संरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कृषितज्ज्ञ कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
डॉ. मुळीक यांनी २७ सप्टेंबर रोजी वयाची ८४ वर्षे पूर्ण करून, ८५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात विद्यार्थी, मित्र, आप्तेष्ट, अधिकारी, शेतकरी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आदींनी डॉ. मुळीक यांचे अभीष्टिचिंतन केले. महाराष्ट्रातील सर्व मुळीक परिवाराने डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे, त्याचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आणि ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. मुळीक बोलत होते.
सध्या सुरू असलेल्या विनाशकारी पावसाचा संदर्भ देत डॉ. मुळीक म्हणाले की, ‘शेती हेच सर्व उद्योग आणि व्यवसायांचे मूळ आहे. मात्र त्याकडे पहिल्यापासून दुर्लक्ष झाले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदल होत आहे आणि त्यामुळे मराठवाड्सारखी अतिवृष्टी होत आहे, असे आपण एकीकडे मान्य करतो; मात्र त्याचवेळी ग्लोबल वॉर्मिंगला अटकाव करण्याची क्षमता असलेल्या शेतीकडे दुर्लक्ष करतो. शेती आणि शेतकऱ्यांएवढी हेळसांड आजपर्यंत कुणाचीही झाली नाही. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत आणि भविष्यात याचे गांभीर्य आणखी वाढेल.’
सोन्याला पर्याय म्हणून आपण बेन्टेक्सचे दागिने घालून हौस पूर्ण करू शकतो. मात्र अन्नाधान्याला पर्याय म्हणून आपण दुसरे काही खाऊ शकतो का? असा सवाल करून, मुळीक म्हणाले, ‘प्रत्येकाला पर्याय आहे, शेतीला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांची सरकारने काळजी घेऊन त्यांना आणि शेती उत्पन्नाला समग्र संरक्षण द्यायला हवे. त्यासाठी ‘इर्मा’सारख्या योजना प्रभावी ठरू शकतात.’
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्वरित दहा हजारांची मदत द्यावी, त्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. तमिळनाडूत मागे एकदा प्रचंड पावसानंतर कोणत्याही सर्वेशिवाय १५०० कोटींची मदत स्वत: पंतप्रधानांनी जाहीर केली होती. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेती कर्जांचे पुनर्गठण करावे. तसेच एनपीएची तरतूद वापरून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशा उपाययोजनाही डॉ. मुळीक यांनी सूचवल्या.
डॉ. कदम, डॉ. चोरगे यांच्याखेरीज शेखर गायकवाड, सुरेश कोते, यशवंतराव खैरे, डॉ. बी. पी. गायकवाड, दिलीप भुजबळ, तुकाराम मुळीक, कमल व्यवहारे, कमल सावंत आदींसह भूमाता परिवारातील हजारो सदस्यांनी डॉ. मुळीक यांना शुभेच्छा दिल्या.