भारतीय साखर उद्योग आता जागतिक दर्जाचा : केंद्रीय मंत्री जोशी

इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर
नवी दिल्ली : अकरा वर्षांत इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर गेले. २०१३ मध्ये पेट्रोलमध्ये केवळ १.५३% इथेनॉल मिसळले जात होते. आता हे प्रमाण १९% वर गेले आहे. अशा परिस्थितीत भारताला खनिज तेलाची आयात कमी करावी लागत आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन वाढत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना उसाला जास्त भाव देण्यात मदत मिळत आहे. भारतीय साखर उद्योग आता जागतिक दर्जाचा झाला आहे, असे केंद्रीय खाद्यान्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. सहकार साखर उद्योग परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार मिळत असल्याचे सांगून मंत्री जोशी म्हणाले की, साखर उद्योग आणि केंद्र सरकार समन्वयाने काम करीत आहे. साखरेची निर्यात वाढत असल्यामुळे व जागतिक बाजारात साखरेला चांगला भाव मिळत असल्यामुळे साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादकांना मदत मिळत असल्याचे दिसून येत आहे. या क्षेत्राला सरकारने वेळोवेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे. आगामी काळातही हे सहकार्य वाढत राहण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या पूरक धोरणामुळे भारतातील साखर उद्योग वेगाने वाढून आता १.३ लाख कोटी रुपयांचा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात समृद्धी वाढण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर ऊर्जा सुरक्षिततेला हातभार मिळत आहे.