सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे थकवले ७० कोटी!  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

थकित बिलासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक

सोलापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचे अद्याप ७० कोटी रुपये थकविल्याचा आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेने केला आहे. या थकित ‘एफआरपी’साठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पुढील आठवड्यापासून खासगी कारखान्यांसमोरही ठिय्या मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काही कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीची, तर काहींनी सहा महिन्यांपूर्वीची एफआरपी थकविली आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरवातीला खासगी कारखान्यांऐवजी सिद्धेश्वर सहकारी कारखान्यासमोर आंदोलन केले. जिल्ह्यातील काही कारखानदारांनी ‘एफआरपी’चा नियम पायदळी तुडवून शेतकऱ्यांच्या पैसे दिलेले नाहीत.  ऊस तोडून कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांत ‘एफआरपी’नुसार पैसे देणे कारखानदारांसाठी बंधनकारक आहे. अन्यथा बँकेच्या व्याजदरानुसार व्याजासह एफआरपी द्यावी लागते. मात्र, शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याने कारखानदार कायद्यातील त्या नियमाला फाटा देत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी रयत क्रांती शेतकरी संघटनेने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी पहिल्यांदा सहकार कारखान्यासमोर आंदोलन केले. मात्र, पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांची  ‘एफआरपी’ दिलेली नाही, त्या कारखान्यांसमोरही आंदोलने केली जाणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

दरम्यान, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याने दोन वर्षांपूर्वीची एफआरपी अजून दिली नाही. त्यामुळे पहिल्यांदा या कारखान्यासमोर आंदोलन केले. आता जिल्ह्यातील अन्य खासगी कारखान्यांसमोर आंदोलने केली जाणार आहेत. ज्या ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत, त्यांना ती द्यावी लागतील, असे रयतक्रांती शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »