जकराया शुगर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर लिमिटेडच्या विरोधात सुरु केलेले उपोषण मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी साखर कारखान्याचे प्रशासन विभागामधील लिपिक सचिन महादेव कानडे (वय ३३, रा. कुरुल, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब पारवे (रा. दादपूर, ता. मोहोळ), विजय चंद्रकांत शिंदे (रा. लक्ष्मी पेठ, आमराई), रमेश देविदास पवार (रा. सोलापूर), गणेश बंडू (रा. सोलापूर), वैशाली अरविंद बनसोडे (रा. नरखेड ), लक्ष्मी किशोर लोंढे (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील संशयित हे जकराया शुगर लि. या कारखान्याचे सभासद तसेच तेथील रहिवासी नसून त्यांचा कारखान्याशी काहीही संबंध नसताना कारखान्याचे संचालक, मालक यांच्यावर रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. त्यांच्यावर प्रदूषण अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे फलक लावून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर चक्री उपोषणासाठी बसले होते.
त्यावेळी फिर्यादी व कारखान्याचे शिष्टमंडळ हे त्यांना भेटून तो कारखाना हजारो लोकांच्या जगण्याचे साधन आहे. कारखान्याची विनाकारण बदनामी होत असून, कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण मागे घेण्यास विनंती केली असता, संशयितांनी दहा लाख रुपये द्या, तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ असे सांगितले. दरम्यान कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना याबाबत लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी उपोषणकर्त्यांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.