‘कर्मयोगी’च्या शेतकऱ्यांचा ऊस बिलांसाठी आत्मदहनाचा इशारा

पुणे : राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट असून, चालू वर्षी गाळपासाठी ऊस उत्पादकांनी दिलेल्या उसाची बिले पाच महिने उलटूनहून मिळाली नाहीत, अशी तक्रार आहे. याबाबतचे लेखी निवेदन कर्मयोगी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी दिले आहे. १ मे पर्यंत, म्हणजे महाराष्ट्र दिनापर्यंत बिले न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनावर मारूती गणपत व्यवहारे, शिवदास लक्ष्मण व्यवहारे, बंडू नामदेव पिंपरे, जोतीराम नामदेव पिंपरे, हनुमंत शिवदास व्यवहारे, भाऊसाहेब सदाशिव सुर्वे, सोमनाथ बाबुराव भगत, दादासो बापुराव भगत (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, हनुमंत भारत राऊत, सुनील विठ्ठल पिंपरे, मंगल रामचंद्र गार्डे, सचिन रामचंद्र गार्डे (सर्व रा. माळवाडी नं. २, ता. इंदापूर) युवराज सुर्यकांत गलांडे, अक्षय युवराज गलांडे (रा. गलांडवाडी, ता. इंदापूर) आदी उस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, आम्ही कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद असून, उस गळीत हंगाम २०२४-२०२५ काळात सुमारे १४३३ टन इतका ऊस देण्यात आला आहे. सदर उसाचे आम्हास अद्याप एक रूपया देखील बिल मिळालेले नाही. आम्ही वारंवार कारखान्याकडे हेलपाटे व पाठपुरावा करून देखील आम्हांस बिलाबाबत सकारात्मक विचार केला जात नाही. आम्ही गोरगरीब शेतकरी असून आमची उपजीविका ही पुर्णपणे शेतीवरच अवलंबुन आहे. कारखान्याने मागील पाच महिन्यापासून आमचे उसाचे बिल अदा केले नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच आमचे मार्च अखेरीस पिक कर्ज थकीत गेले आहे. त्यामुळे त्यांच्या व्याजाचा बोजा आमच्यावर पडलेला आहे.
त्यामुळे या कारखान्याने १ मे २०२५ पर्यंत बिल अदा न केलेस आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचे परिणामास कारखाना प्रशासनास जबाबदार धरण्यात यावे. त्यामुळे आम्ही उपरोक्त अर्जदार दिनांक १ मे २०२५ रोजी तहसील कचेरी इंदापूर येथे सामुदायिक आत्मदहन करणार आहोत, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आमच्या अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार होवून आमचा गाळपास गेलेले ऊसाचे बिल तत्काळ अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.