AI चा वापर करणारा पहिला साखर कारखाना
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यांचा वापर करून संपूर्ण ऊस तोडणी चे नियोजन करणारा देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे. जगभरातल्या अतिशय प्रगत देशात अशी प्रणाली वापरली जाते. यासाठी साखर कारखान्याने महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीशी करार केला आहे.
ह्या प्रणालीबाबत अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे म्हणाले कि, संजीवनी कारखाना हा नेहमीच तंत्रज्ञान वापराबाबत अग्रेसर राहिला आहे. कारखान्याचे संस्थापक स्व शंकरराव कोल्हे ह्यांच्या प्रेरणेतून कारखाना वाटचाल करत आहे. प्रचलित पद्धतीमध्ये आम्हाला साखर उतारा तपासून मगच तोडणी प्रोग्रॅम करण्यासाठी बराचसा वेळ आणि श्रम जात होते. तसेच हंगाम सुरु असताना अपरिपकव ऊस मधेच गाळपाला आला तर त्याने साखर उताऱ्यावर परिणाम होत होता. सॅटेलाईट मॅपिंग पद्धती मध्ये सॅटेलाईट मधील मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या मदतीने ऊस पिकाचे हरित द्रव्यातील पृथक्करण करून शेतामध्ये उभ्या असलेल्या ऊसाची साखर उतारा तपासणी केली जाते आणि त्यासोबत हवामान घटकांचा देखील सॅटेलाईट मार्फत अभ्यास केला जातो.
ह्या सर्व माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल वापरून पृथक्करण केले जाते आणि प्रत्येक आठवड्याला ह्यात आलेले निष्कर्ष साखर कारखान्याच्या लॅब मध्ये देखील फेर पडताळणी केली जाते. ह्यात आलेले निष्कर्ष ह्या वर्षी ९५ टक्के पेक्षा अचूक असल्याचे आढळून आले. आणि त्यामुळे ह्या आधारित तोडणी प्रोग्रॅम राबवल्याने खर्चात बचत होऊन, एकूण ०.२ अधिक साखर उतारा मिळाला.
तसेच प्रायोगिक तत्वावर ५०० शेतकऱ्यांच्या प्लॉट चे सॅटेलाईट द्वारा आलेल्या जैविक आणि अजैविक ताणाचे देखील निरीक्षण केले गेले आणि त्यात देखील अत्यंत समाधानकारक निकाल आले आहेत. ह्याचा उपयोग करून शेतावर आलेल्या कीड रोगांची माहिती तसेच पाण्याचाही ताणाचे सॅटेलाईट मधून पृथक्करण करून मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना वेळीच योग्य तो निर्णय घेण्यास मदत होणार आहे. कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री दिवटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती खात्याचे प्रमुख श्री देवकर आणि श्री शिंदे ह्यांच्या अथक प्रयत्नातून ह्या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाली.
कारखान्याचे चेअरमन श्री विवेक कोल्हे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री बिपीन दादा कोल्हे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती खात्याचे पूर्ण काम कागद विरहित करण्यास प्राधान्य दिले गेले असून कारखाना सभासदांचा प्रत्येक प्लॉट हा मोबाइल अप्लिकेशन द्वारे नोंदवला जात आहे.
श्री सुतार, मॅनेजिंग डायरेक्टर अधिक माहिती देताना म्हणाले की सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने सर्वप्रथम देशात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्रा च्या ह्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली. त्यात टप्या टप्याने वाढ करत ह्या हंगामात संपूर्ण कार्यक्षेत्रावर त्याचे नियोजन केले. शेती खात्याला आधुनिक तंत्रज्ञान देत असताना अंमलबजावणी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली त्याचा चांगला परिणाम ह्या कठीण हंगामात दिसून आला आहे. साखर उताऱ्यात मागील वर्षीपेक्षा समाधानकारक वाढ मिळाली. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात होणार आहे.
२०२३-२४ हंगामाची वैशिष्ट्ये:
१. एकूण ७,०९,११२ मे टन ऊसाचे गाळप आणि साखर उतारा १०.५९
२. AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तोडणी प्रोग्रॅम वापरणारा देशातला पहिला कारखाना
२. साखर उताऱ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांची वाढ
३. शेतकऱ्यांना सॅटेलाईट मार्फत ऊस पिकावर आलेल्या कीड रोगांची माहिती देणारा पहिला कारखाना
४. पूर्णपणे कागदविरहित कामकाज करणारा भागातील पहिला कारखाना.
आता सॅटेलाईट द्वारे पिकाच्या जैविक आणि अजैविक ताणाचे होणार निरीक्षण
साखर कारखाने हे आता बायो रिफायनरी होणार असल्याने कच्च्या मालाचा पुरवठा हा अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे. ऊस पिकाची उत्पादकता वाढवणे हे आता साखर कारखानदारीसमोर मुख्य आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्लॉट वर नजर असणे आवश्यक असणार आहे. ज्या प्लॉट्स वर काही जैविक अथवा अजैविक ताण दिसत असेल त्या प्लॉट्स च्या संबंधित शेतकऱ्याला सूचना देणे आता शक्य होणार आहे. कारखाने आता २० ते २५ हजार प्लॉट्स नोंदणी करतात प्रत्येक प्लॉट वर लक्ष ठेवणे शक्य नसायचे आता ह्या तंत्रज्ञानामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे कारखान्यांना शक्य होणार आहे आणि उत्पादन वाढीला ह्या अशा तंत्रञानाची मदत घेऊनच पुढे जावे लागणार आहे.