ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला
सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १३ लाख ७२ हजार ४९ मेट्रिक टन ऊस पूर्ण केले आहे.
यापूर्वी हंगाम १९९५-१९९६ मध्ये कारखान्याने १३ लाख ७१ मेट्रिक टन गाळप करून उल्लेखनीय नोंद केली होती. मात्र यंदा विक्रमालाही मागे टाकत नव्या उच्चांकाची नोंद करण्यात आली.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ११ वर्षांपासून कृष्णा कारखान्याने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कारखान्याचे व्यापक आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यातून प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मिलिंग, साखर प्रक्रिया, सहवीजनिर्मिती, आसवनी व इथेनॉल प्रकल्पांमध्ये स्वयंचलित यंत्रणा बसविल्यामुळे उत्पादन कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही योग्य नियोजन, शिस्तबद्ध ऊस तोडणी वाहतूक व्यवस्था आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर गाळप हंगाम सुरळीत ठेवण्यात कारखान्याला यश आले आहे. सभासद शेतकऱ्यांकडून वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने ऊसपुरवठा होत असल्याने उत्पादन प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी दिली.
ऊस कृष्णा कारखान्याने बेणेमळा, रोप निर्मिती कार्यक्रमांवर विशेष भर देत जयवंत आदर्श ऊस विकास योजना तसेच ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते. ऊर्जा बचत, आर्थिक शिस्त आणि तांत्रिक नवकल्पना यामुळे कारखान्याला आतापर्यंत मानाच्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.






