कुंभी-कासारी कारखान्याचा ऊस दर राज्यात सर्वाधिक

कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामाकरिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. हा राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक दर आहे.

आ. नरके म्हणाले, हंगाम २०२४-२५ मध्ये दिनांक २३ डिसेंबर २०२४ अखेर १,३०,०५० मे.टन उसाचे गळीत करुन १,४२,८२० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.२२ टक्के इतका आहे. कारखान्याचे डिस्टिलरी आणि कोजन प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने आहेत. त्याचा कारखान्याला मोठा लाभ होईल.
या हंगामात सात लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. सर्व सभासद, बिगर सभासद यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावे, अशी विनंती आमदार नरके यांनी यावेळी केली. कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव अशांत पाटील उपस्थित होते.
उसाला सर्वाधिक दर देण्याची स्पर्धा नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातच आहे. कुंभी-कासारीनंतर विश्वासराव नाईक कारखान्याकडून ३२२५ रूपये प्रति टन पहिला हप्ता अध्यक्ष मा. आमदार मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केला आहे.
त्यानंतर वाळवा तालुक्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह. साखर कारखान्याचा क्रमांक लागतो. कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी रू. ३२०४ प्रति टन एवढा दर जाहीर केला आहे. त्यापुढे भोगावती कारखान्याचा क्रमांक लागतो. त्याने ३२०० रूपये पहिली उचल जाहीर केली आहे. चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, व्हा. चेअरमन राजेंद्र कवडे, प्र. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी याबाबत घोषणा केली.
याच तालुक्यातील डालमिया शुगरनेदेखील ३२०० रू. प्रति टन दर जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा कारखान्याने ३२०० रू, तसेच क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड कारखान्याने ३२०० रू, सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्यतारा कारखान्याने ३२०० रू, चेअरमन नवीद मुश्रीफांच्या सरसेनापती घोरपडे कारखान्याने ३१०० रू, ओंकार समूहाने ३००१, नगर जिल्हयातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने रू. ३००० असे दर जाहीर केले आहेत.