कराडमध्ये उसाच्या फडात बिबट्याचा मृत्यू

उंब्रज (ता. कराड ) : कराड तालुक्यातील चरेगाव येथे उसाच्या शेतात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदाशिव दबडे यांच्या ‘धारकरा मळा’ शिवारातील शेतात ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली. बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्याचा मृत्यू अंदाजे ८ ते १० दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ऊसतोड कामगारांना पाचटीमध्ये दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता, बिबट्याचा मृतदेह शेतातील तारेत अडकलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे वन विभागाचा पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिकृतरीत्या स्पष्ट होईल.
ग्रामस्थांमध्ये भीती: चरेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. सीसीटीव्हीमध्येही तो अनेकदा कैद झाला होता. मात्र, आता बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






