‘मायक्रोसॉफ्ट ब्रेकडाऊन’चा धडा

आवडल्यास ही बातमी शेअर करा
  • भागा वरखडे

कोणत्याही तंत्रज्ञानाची मोनोपॉली झाली किंवा त्याच्या आहारी जाऊन दुसरे पर्यायी तंत्रज्ञान स्वीकारले नाही अथवा हे तंत्रज्ञान स्वीकारण्यापूर्वी ज्या पद्‍धतीने काम चालत होते, त्याचा विसर पडला, की काय होते, हे जगाने शुक्रवारी अनुभवले. एखादे तंत्रज्ञान कितीही उपयुक्‍त असले, तरी त्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेले आणि अचानक त्यात काही दोष झाला, की संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागत असतील, तर हाती काही पर्याय असला पाहिजे, याची जाणीव शुक्रवारच्या घटनेने करून दिली आहे.


‘मायक्रोसॉफ्ट क्लाउड आउटेज’मुळे जगासमोर अनेक चिंताजनक प्रश्न निर्माण झाले आहेत. या आउटेजमुळे जगभरातील बड्या वित्तीय संस्थांना मोठा झटका बसला आहे. याशिवाय विविध देशांतील अनेक विमानसेवाही खंडित झाल्यामुळे ठप्प झाल्या होत्या. आज आपण एका अतिशय गुंतागुंतीच्या माहिती युगात जगत आहोत, जिथे डेटाने संपूर्ण जगाला एकत्र बांधले आहे.

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपासून ते वित्तीय संस्था, किरकोळ, ई-कॉमर्स, विपणन आणि जाहिरात, आरोग्यसेवा, एअरलाइन्स, जवळजवळ सर्व मोठे व्यवसाय डिजिटल पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत. त्यांची सर्व माहिती ‘क्लाउड सर्व्हर’वर साठवली जाते. या व्यवसायांना क्लाउड सेवा पुरविण्यात ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टची नावे आघाडीवर आहेत. ‘क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर’मध्ये जागतिक बाजारपेठेत ॲमेझॉनचा एकूण हिस्सा ३१ टक्के आहे तर मायक्रोसॉफ्टचा २५ टक्के आहे. अशा स्थितीत या कंपन्यांच्या ‘क्लाउड सिस्टीम’मध्ये किरकोळ बिघाड किंवा छेडछाड होऊन जगभर खळबळ माजली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

‘मायक्रोसॉफ्ट क्लाउड आउटेज’चे कारण काय आहे, हे सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर ‘क्राउड स्ट्राइक’शी कसे जोडलेले आहे? आउटेज का झाला? आदी प्रश्नांची उत्तरे शोधली, तरच जग शुक्रवारी का ठप्प झाले, हे कळू शकेल. ‘क्राऊड स्ट्राईक’हे सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर आहे. ते वापरकर्ते आणि मोठ्या व्यवसायांना प्रगत सुरक्षा प्रदान करते. ‘क्राऊड स्ट्राईक’ कंपनीचे सुरक्षा सॉफ्टवेअर, मायक्रोसॉफ्टची विंडो ऑपरेटिंग सिस्टमसह एकत्रित येते. ही कंपनी रिअल-टाइम सायबर धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी क्लाउड-आधारित एआय आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरते. ‘क्राऊड स्ट्राईक’ कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या अलर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या क्रॅश होण्याचे मुख्य कारण कंपनीचे फाल्कन सेन्सर बनत आहे. या घटनेचे पडसाद जगभर उमटले आहेत. भारत, अमेरिका, जपान. जर्मनी सारख्या जगातील अनेक देशांमध्ये विंडोज सिस्टम क्रॅश झाल्यामुळे एअरलाइन्स, बँकिंग, रिटेल आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित व्यवसायांवर वाईट परिणाम झाला.

मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवेच्या सुरक्षितता आणि विश्वासार्हतेशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगभरातील मोठे उद्योग मायक्रोसॉफ्ट ‘क्लाउड नेटवर्क’शी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत, कंपनीने सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही थर्ड पार्टी सेवेचा वापर केल्यास संपूर्ण कंपनीच्या मुख्य प्रणालीमध्ये बिघाड होऊ शकतो. आज जगभरातील अनेक मोठ्या संस्था आणि मोठे व्यवसाय ‘मायक्रोसॉफ्ट अझ्युअर क्लाउड’ सेवा वापरतात. अशा अपडेट्स आणि अपयशांमुळे जगभरात आर्थिक धक्के येऊ शकतात. बँकांतील खातेदारांची माहिती, त्यांच्या पैशाचा तपशील एखाद्याच्या हातात पडून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.

अधिक गंभीर बाब म्हणजे संरक्षण यंत्रणांचा डाटा शत्रूराष्‍ट्राच्या हाती पडला, तर मोठा धोका होण्याची शक्यता असते. मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक प्रणालीतील समस्येने जग हादरले आहे. त्यामुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टशी संबंधित संगणक प्रणाली ठप्प झाली असून विमानतळाची यंत्रणाही विस्कळीत झाल्याचे दिसून आले. बँका, स्टॉक एक्सचेंज, पेमेंट सिस्टम आणि आपत्कालीन सेवा प्रभावित झाल्या. शेवटी, अशी कोणती चूक होती जी जगाला ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’वर घेऊन गेली? यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. प्रथम, हा एक मोठा सायबर हल्ला असू शकतो आणि दुसरे म्हणजे, फारच कमी कार्यक्षेत्रात फाइल ठेवणे आणि चाचणी न करता ती सिस्टममध्ये अपलोड करणे धोकादायक आहे. जगातील सर्व लहान-मोठ्या देशांनी या घटनेतून धडा घ्यावा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी ठोस करार केला पाहिजे. मायक्रोसॉफ्टची प्रणाली अजूनही गुंतागुंतीची आहे.

जगभरातील लाखो लोक सॉफ्टवेअरशी जोडलेले आहेत. असे गृहीत धरा, की एका प्रणालीवर अनेक कर्मचारी काम करत आहेत. तिथे इतकी गुंतागुंत आहे, की कुणा एकाला कळत नाही; मात्र केंद्रीय पातळीवर त्यांच्यात समन्वय आहे. कोणीतरी व्यवस्थेत बदल केल्यानंतर फाईल सर्व सिस्टीममध्ये अपडेट करावी लागते. त्यादरम्यान एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक कुणाच्या लक्षात आली नाही, तर बाकीची सिस्टीम अपडेट होत जाते आणि ती चूक वाढत जाते. अल्पावधीतच जगावर तिचा प्रभाव जमिनीपासून आकाशापर्यंत दिसायला लागला.

सगळे काही ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. अशी कोणतीही फाईल अपडेट करण्यापूर्वी चाचणीची प्रक्रिया असते. या टप्प्यावर काही निष्काळजीपणा होता. त्यानंतर चूक लक्षात आल्यावर त्याचा परिणाम जगावर होऊ लागला होता. समन्वयाचा अभाव त्यातून दिसला. हजारो सॉफ्टवेअर्स असतात. त्यात काय बदल झाले आहेत, याची माहिती व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरावर असायला हवी. विमान हवेत असताना त्याचा फारसा परिणाम होत नाही; परंतु पायलट जेव्हा त्या यंत्रणेच्या संपर्कात येतो तेव्हाच त्याला अडचणी येतात. कारण: संगणक किंवा लॅपटॉप काम करणार नाही. तिथे ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’ दिसेल. सॉफ्टवेअर अद्ययावत होत नाही. विमान उतरल्यानंतरच त्याचा परिणाम दिसून येईल. यानंतर पायलट, एअरलाइन्स कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना ही समस्या दिसून येईल. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व देशांना एकत्रित धोरणावर काम करावे लागेल. त्यांना सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

अशा घटनांना शत्रू राष्ट्रेही जबाबदार असतात. ते हॅकर्सच्या मदतीने इतर देशांच्या सिस्टमवर हल्ला करतात. लोक किंवा राष्ट्रे आयटी प्रणालीवर पूर्णपणे अवलंबून आहेत, हे आपण पाहिले पाहिजे. त्यांना वाटते की त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे संपूर्ण जग चालवत आहेत. सत्य हे आहे की त्यांना या व्यवस्थेची सवय झाली आहे. त्यांना सुविधा मिळते; पण ते सायबर सुरक्षा विसरतात. प्रत्येक फाईलची स्वतःची सुरक्षा प्रणाली असते. सर्व देशांना संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अंगीकारावी लागेल. खबरदारी घ्यावी लागेल. हा सायबर हल्ला असेल, तर जगाला त्याची जाणीव तर ठेवावीच लागेल; पण त्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावी लागतील. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध देशांमध्ये कोणताही करार नाही.

सर्व देशांना एकत्रित व्यासपीठावर काम करावे लागेल. लहान-मोठ्या सर्व देशांनी समान तरतुदी आणि करारांकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. गेल्या मार्चमध्ये मायक्रोसॉफ्ट सिस्टमवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी रशियाच्या परदेशी गुप्तचरांशी संबंधित हॅकर्सनी कॉर्पोरेट ईमेलमधून चोरीला गेलेला डेटा वापरून सिस्टममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आस्थापनांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आताच्या घटनेमागे सायबर दहशतवाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या सिस्टम आणि सेवांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता करण्यासारखी परिस्थिती होती. या कंपनीच्या माध्यमातून अमेरिकन सरकारला डिजिटल सेवा आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातात.

मायक्रोसॉफ्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की या घुसखोरीमागे मिडनाईट ब्लिझार्ड किंवा नोबेलियम नावाचा रशियन राज्य प्रायोजित गट आहे. वॉशिंग्टनमधील रशियन दूतावासाने त्या वेळी मायक्रोसॉफ्टच्या विधानावर टिप्पणी करण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. ‘मिडनाईट ब्लीझार्ड ॲक्टिव्हिटी’बाबत मायक्रोसॉफ्टने केलेल्या आधीच्या विधानांनाही प्रतिसाद दिला गेला नाही. जानेवारीच्या सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टने म्हटले होते, की हॅकर्सनी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांचे कॉर्पोरेट ईमेल खाते तसेच सायबर सुरक्षा, कायदेशीर आणि इतर कार्ये यांच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मायक्रोसॉफ्टचे विशाल ग्राहक नेटवर्क पाहता, त्याला लक्ष्य केले जात आहे हे आश्चर्यकारक नाही. ‘मायक्रोसॉफ्ट आउटेज’चा परिणाम भारत, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, जपान, स्पेन, सिंगापूरसह अनेक देशातील कंपन्या, विमान कंपन्या, बँका आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर झाला. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड युनिट अझूरने सांगितले, की जगभरातील विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या व्हर्च्युअल मशीन्सवर या आउटेजमुळे परिणाम झाला आहे. ‘क्राउड स्ट्राइक अपडेट’ने जगभरात दहशत निर्माण केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »