‘श्री विठ्ठल’ला मिळणार ३४७ कोटींची मदत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आणखी चार कारखान्यांना ६७५ कोटींचे कर्ज

मुंबई : महाराष्ट्र सरकारने आणखी चार सहकारी साखर कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव एनसीडीसीला दिला आहे. या कारखान्यांना सुमारे ६७५ कोटी मार्जिन मनी उपलब्ध करून द्यावे, असा सरकारचा आग्रह आहे. त्यात अभिजित पाटील यांचे नेतृत्व असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना (१४८.९० कोटी), शेतकरी सहकारी साखर कारखाना – औसा (२२.९७ कोटी), श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना (३४७.६७ कोटी), विश्वासराव नाईक सह. साखर कारखाना (६५ कोटी) आणि अशोक सहकारी साखर कारखाना (९०.३० कोटी) यांचा त्यात समावेश आहे. हा प्रस्ताव एकूण रू. ६७४.८४ रुपयांचा आहे.

या कारखान्यांनी एनसीडीसीकडे (नॅशनल को-ऑप डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) राज्य सरकारच्या माध्यमातून मार्जिन मनीसाठी प्रस्ताव दिला आहे. राज्य सरकार या कारखान्यांना मदत करण्याची शिफारस करत आहे. मात्र एनसीडीसीचा ९.८१ टक्के व्याज दर खूप अधिक आहे. तो कमी करावा आणि फ्लोटिंग ठेवावा, अशी विनंती राज्य सरकारने एनसीडीसीचे संचालक गिरराज अग्निहोत्री यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात २२६५ कोटींचा निधी पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावाद्वारे दिला आहे, याकडेही पत्रामध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर श्री विठ्ठल स. सा. का. चे चेअरमन, अभिजित पाटील यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवळीक वाढली होती. मात्र त्यांना आपल्या गोटात वळवून घेण्यात सत्ताधारी महायुतीला यश आले. त्यातच आता पाटील यांच्या कारखान्याला माठी मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

राज्य सरकारने ११ साखर कारखान्यांना १५९० कोटींच्या कर्जाची मदत यापूर्वीच केली आहे. सुरुवातीला १३ कारखान्यांना सुमारे १८०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या यादीतून भोरचा राजगड सह. साखर कारखाना आणि नगरमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्यांना वगळण्यात आले आहे. त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जाते.
भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि नगरच्या कोल्हे परिवाराची लोकसभा निवडणुकीत महायुतीला मदत झाली नाही, अशी चर्चा आहे.

हेदेखील वाचा : १३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »