१० पारितोषिकांसह देशात महाराष्ट्र प्रथम

राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिकांचे वितरण
नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेच्या वतीने देशातील सहकारी साखर कारखान्यांना तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, कमाल ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी कारखान्यांचा गुणवत्ता पारितोषिके देऊन गौरव केला जातो. याहीवर्षी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या गुणवत्ता पारितोषिकांचा वितरण समारंभ गुरुवारी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेन्टर येथे पार पडला. या समारंभात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक, तर तमिळनाडूने पाच पारितोषिकांसह दुसरा क्रमांक पटकावला. गुजरात, उत्तर प्रदेशने चार पारितोषिके मिळविली. पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला. या वेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न् आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निबूबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते विजेत्या सहकारी साखर कारखान्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. २०२३-२४साठीच्या एकूण २५ गुणवत्ता पारितोषिकांसाठी देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा ही होती.
या पारितोषिक वितरण समारंभाचे दीपप्रज्वलन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री निबूबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, साखर आणि जैव-ऊर्जा क्षेत्रातील सर्व प्रमुख भागधारक आणि साखर उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ मंडळी तसेच देशभरातील संपूर्ण साखर उद्योगाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
पारितोषिक वितरणाच्या मुख्य कार्यक्रमात मंत्री श्री जोशी यांनी, सहकार क्षेत्राचे महत्त्व, त्यामुळे शेती आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात झालेला मोठा बदल आणि भविष्यातील आव्हानांकडे लक्ष वेधले. सहकार क्षेत्राचे व्यापक हित लक्षात घेऊन मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांकडे लक्ष वेधत असतानाच त्यांनी मोदी सरकार येण्यापूर्वी असलेले इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, एफआरपी, साखर निर्यात, साखरेची विक्री किंमत आणि त्यात झालेली वाढ झाली यांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली.
मोदी सरकारने शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रास्ताविकात आभार मानले. उसाची एफआरपी वाढत असताना साखरेची विक्री किंमतसुद्धा वाढविण्यात यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक ताकत दिली जात असताना कारखान्यांनाही बळ मिळाले पाहिजे आणि त्यासाठी साखरेचे विक्री दर वाढणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे सचिव सुमित झा यांनी केले, तर हर्षवर्धन पाटील आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी स्वागत केले.
पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा गौरव
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी कारखान्यास उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर भीमाशंकर साखर कारखान्यास ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार देण्यात आला, तसेच साखर, वीज, इथेनॉल, अर्थकारण अशा सर्वच बाबींमध्ये संपूर्ण देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोमेश्वर साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.