माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला; चुरशीने ८८. ४८ टक्के मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष

बारामती  : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २१ जागांसाठी चुरशीने मतदान झाल्याने ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता मात्र उद्या, मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

रविवारी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या मोठी होती. ३७ गावांतील ६७ मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण  ८८. ४८ टक्के मतदान झाले आहे.  यासाठी १९,५४९ मतदारांपैकी १२,८६२ पुरुष आणि ४,४३४ महिलांनी मतदान केले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यंत अटीतटीच्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व चंद्रराव तावरे यांचे तीन पॅनेल निवडणुकीत आमने-सामने ठाकले आहेत, त्यामुळे उद्या, मंगळवारी (दि. २४)  होणाऱ्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री व श्री निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार अजित पवार यांनी सकाळी लवकर शहरातील प्रशासकीय भवन येथे मतदान केले. तसेच श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल माळेगाव केंद्रात खा. सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे रंजन तावरे यांनीदेखील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल माळेगाव केंद्रात मतदान केले. तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख व चेअरमनपदाचे उमेदवार माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनीही सांगवी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

एका मताला किती भाव ?

या निवडणुकीसाठी बहुतांश उमेदवारांनी मते विकत घेण्यासाठी वारेमाप पैशांचे वाटप केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात रंगली होती. मताला  १० हजार रुपयांचा भाव फुटला आणि ५० रुपयांचे टोकन देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. या प्रतिकूल स्थितीमुळे  ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेने मात्र भल्या भल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »