माळेगाव कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळणार
माळेगाव ः मागण्यांची पूर्तता न करणे, तसेच ठराविक कामगारांना केलेल्या पगारवाढीच्या निषेधार्थ माळेगाव साखर कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
माळेगाव कारखाना संचालक मंडळाने फक्त ९६ कामगारांची नुकतीच पगारवाढ केली. या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याने सोमवारी (दि.१७) कारखाना बंद आंदोलन करण्याचा निर्धार कामगारांनी केला होता. मात्र, प्रशासनाने तोडगा काढून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
कामगारांनी प्रशासनाचा मान ठेवून काम बंद आंदोलन स्थगित केले. मात्र, ४०० कामगारांनी कारखाना प्रशासनाकडे सदर पगारवाढ झालेल्या कामगारांची यादी व ठराव प्रत तसेच पगारवाढीच्या बाबतीत कामगार संघटनेच्या दोन युनियनसोबत झालेल्या कराराची सही-शिक्का असलेली प्रत या मागण्या अर्जाद्वारे केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने बुधवारी (दि. १९) कारखाना गेटवर जमून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी कामगार म्हणाले की, सर्व कामगार हे कारखान्याचे सभासद आहेत. प्रशासनाने ठरावीक कामगारांना पगारवाढ करणे चुकीचे आहे. तसेच कामगार संघटनांनी देखील कामगारांचा विश्वासघात केला आहे. कामगारांशी प्रतारणा केल्यास त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.