‘स्वामी समर्थ शुगर’चे नाव चुकून जप्तीच्या यादीत : व्यवस्थापन

अहिल्यादेवी नगर : नेवासा तालुक्यातील स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीजने एफआरपीची देणी नियमाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहेत, परंतु साखर आयुक्तालयाने जप्तीसाठी जारी केलेल्या कारखान्यांच्या यादीत आमच्या कारखान्याचे नाव तांत्रिक कारणाने चुकून आले आहे, असा खुलासा कारखान्याच्या संचालिका डॉ. ममता शिवतारे – लांडे यांनी व्यवस्थापनाच्या वतीने केला आहे. त्यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची व्यक्तिश: भेट घेऊन एफआरपी बाबतची कागदपत्रे सादर केली.
स्वामी समर्थ शुगरने चाचणी गळीत हंगामात ऊसाला प्रति टन २८०० रुपये प्रमाणे भाव देण्याचा निर्णय घेतला आणि ऊस बिलांची रक्कम १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली. त्याच प्रमाणे प्रादेशिक संचालक (साखर) यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्याचे बिल अदा केलेले रिपोर्ट वेळोवेळी व्यवस्थापनाकडून सादर केले आहेत, असे व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
त्यात पुढे खुलासा केला आहे की, साखर आयुक्तांनी यासंदर्भात १७ मार्च रोजी बोलवलेल्या बैठकीला काही कारणास्तव कारखान्याचा प्रतिनिधी पोहोचू शकला नाही. त्यामुळे साखर आयुक्त यांच्या सुनावणीनुसार जप्तीच्या आदेशाच्या यादीमध्ये स्वामी समर्थ शुगरचे नाव समाविष्ट झाले होते.
कारखान्याने १५ फेब्रुवारी पर्यंतची ऊस बिलाची रक्कम ९०% शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, केवळ बैठकीला हजर राहता न आल्याचे यादीत नाव येऊन, चुकीची माहिती प्रसिद्ध झाली, असेही त्यात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांची एफआरपी थकवणाऱ्या १५ कारखान्यांवर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी सुरू केली असून, त्याची यादीही प्रसिद्ध केली आहे.