‘माणगंगा’वर ३५ वर्षांनी सत्तांतर
![Manganga sugar factory, Atpadi](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/06/manganga-sugar-copy.jpg?fit=768%2C468&ssl=1)
पाटील प्रणीत पॅनलच्या १८ संचालकांची बिनविरोध निवड
सांगोला – आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख प्रणित पॅनलमधील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तानाजी पाटील प्रणीत पॅनलचे सर्व १८ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या आघाडीची सत्ता तब्बल ३५ वर्षे होती. मात्र गेल्या काही दिवसांत चमत्कारिक धडामोडी घडल्या आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली, त्यानंतर माजी आमदार देशमुख यांच्या उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे तानाजी पाटील यांच्य पॅनलमधील सर्व म्हणजे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गटाचे कुंडलिक आनंदा आलदर, रमेश शिवाजी हातेकर, सुरेश पांडुरंग जरे आणि दादासाहेब वाघमोडे असे चार संचालक बिनविरोध निवडून आले. पाटील यांनी आ. शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार साळुंखे यांच्यासमवेत आघाडी करून सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र निवडणुकीच्या आधीच सत्तांतर झाले.
सध्या हा कारखाना बंद असून, मोठ्या आर्थिक संकटात आहे.