ड्रोन क्रांतीमुळे मोठे परिवर्तन

–मंगेश तिटकारे
सन १८४९ मध्ये ऑस्ट्रियन लोकांनी व्हेनिसवर हल्ला करताना हवेत उडणाऱ्या फुग्यांना स्फोटकं जोडली. याचा वापर करून व्हेनिसच मोठे नुकसान करता येईल हा हेतू होता. तथापि ऐनवेळी वारे विरुद्ध दिशेला वाहू लागले आणि फुग्यांचा स्फोट ऑस्ट्रियन लोकांवरच झाला. या घटनेला ड्रोनची सुरुवात म्हणता येईल. तेव्हापासून दीड शतके सातत्याने यात जगभर सुधारणा झाल्या. चालकरहित विमाने व शस्त्र वितरण प्रणालीच्या स्वरूपामध्ये ड्रोन आले. लष्करी उपयोगासाठी ते प्रथम वापरले गेले. पहिल्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेने १८१६ मध्ये पायलटरहित UAV तयार केले व १९४१ मध्ये अमेरिकेने रिमोट कंट्रोल असलेले रेडियो प्लेन OQ2 दुसऱ्या महायुद्धा दरम्यान वापरात आणले. १९८२ मध्ये इस्त्राईल फौजांनी सिरीयन सैन्यांच्या विमानांचा पाडाव करण्यासाठी UAV चा वापर केला.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात ड्रोन आकारमानाने लहान होऊ लागले. बी.एल.डी.सी. मोटर्स व उच्च ऊर्जा घनता असलेल्या लिथियम पॉलिमर बॅटरीच्या आगमनाने त्याची कार्यक्षमता सुधारली व खर्च कमी झाला. ड्रोन क्रांतीचा जन्म होऊ लागला. सुरुवाती सुरुवातीला सैन्यासाठी वापर करण्यामागे याचा भर होता. भारतीय लष्कराने १९९० च्या दशकात इस्त्राईलकडून मानवरहित हवाई वाहने (UAV) घेण्यास सुरुवात केली. आणि लवकरच हवाई दल आणि नौदलामध्ये पण ड्रोनचा वापर होऊ लागला. १९९९ च्या कारगिल युद्ध दरम्यान नियंत्रण रेषेवर छायाचित्रणासाठी भारताने प्रथमच लष्करी ड्रोनचा वापर केला. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने UAV आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
भारतात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (D.G.C.A.), मानवी, स्वयंचलित व मानव रहित अशा सर्व हवाई वाहनांच्या वापरावर देखरेख करते. हवाई वाहने UAV मूळतः लष्करी अंतराळ उद्योगासाठी तयार केली गेली असली तरी विविध व्यवसायांना त्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे नागरी क्षेत्रात त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे.

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) आणि इतर नेवीगेशन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ड्रोन मल्टी टास्किंग साधन बनले आहे. लष्करी ते नागरी वापरात संक्रमण झाल्यामुळे भारतात ड्रोनच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
भारतातील व्यावसायिक क्षेत्रात डोनच्या वापराची प्रचंड वाढ झाली आहे. कृषी पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स उद्योगांनी कार्यक्षमता आणि अचूकता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. प्रगत सेंसरने सुसज्ज कृषी ड्रोन पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. तर बांधकाम कंपन्या सर्वेक्षण आणि मॅपिंगसाठी ड्रोन वापरतात. हळूहळू यामध्ये चांगल्या कॅमेऱ्याची भर पडू लागली. प्रतिमा स्थिरीकरण करू शकणारे कॅमेरे यात बसवण्यात आले.
त्यानंतर पहिला गैर लष्करी प्रयोग हवाई छायाचित्रण व छायांकनासाठी होऊ लागला. त्यानंतर प्रतिमा प्रक्रिया व डेटा सांख्यिकी गोळा करण्यासाठी सॉफ्टवेअर सुधारत असताना नवीन कामकाजासाठी ड्रोनचा वापर सुरू झाला. यात अचूक शेती जमीन सर्वेक्षण मॅपिंग अशा विविध कल्पनांचा समावेश होता. पुढील टप्प्यात बॅटरी तंत्रज्ञान विकसित झाले.
ड्रोन तंत्रज्ञान रिमोट कंट्रोल सिस्टीम भोवती बांधले गेले, त्यामुळे वापरकर्त्यांना या उडत्या वस्तू अभूतपूर्व अचुकतेने चालवता आल्या. तांत्रिक रचनेत मूलभूत नेविगेशन घटक जोडले गेले आणि ड्रोनची क्षमता चांगलीच वाढली. ड्रोनचे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. तंत्रज्ञान जसजसे सुधारत जाईल, तसतसे ड्रोनचा जास्त वापर दिसून येईल.
सध्याच्या काळात आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रवेश केलेला आहे. ड्रोन तंत्रज्ञानात Al चा समावेश केल्याने एआय अल्गोरिदमने सुसज्ज असलेले ड्रोन रियल टाईममध्ये डेटा विश्लेषण करू शकतात, ज्यामुळे ते आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या उपयोगांसाठी महत्त्वाचे ठरतात. ‘ड्रोन रेसिंग’ ही एक लोकप्रिय मनोरंजनात्मक खेळ उदयास आलेला आहे. व्यावसायिक ड्रोन वैमानिकांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक नवीन व्यासपीठ निर्माण झालेले आहे.
ड्रोन फोटोग्राफी स्थिरता अचूकता आणि बहुमुखी प्रतिमा, दर्जाची प्रतिमा गुणवत्ता या सेवांमुळे ड्रोनचा वापर अतुलनीय दृश्य अनुभव देऊ शकतात. त्यात 4K HD असलेल्या २० दशलक्ष पिक्सेल कॅमेऱ्याने सुसज्ज ड्रोन छंद प्रेमी आणि व्यावसायिक लोक अशा दोघांनाही उपयुक्त ठरतात. त्यात असलेली मजबूत स्थिरीकरण प्रणाली चांगले फुटेजवरुन, सुस्पष्ट तपशीलवार हवाई चित्र देतात. गतिमान फुटेज शोधणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी असे ‘ड्रोन गेम’ चेंजर आहेत. हे ड्रोन अरुंद जागेतही गुळगुळीत, सिनेमॅटिक दृश्य कॅप्चर करतात. विस्तीर्ण पॅनारोमापासून शांत किनारपट्टी पर्यंत छायाचित्रण उच्च रिझोल्युशन कॅमेऱ्याने करू शकतात. लग्न असो वा संगीत महोत्सव, ड्रोन कार्यक्रमाच्या छायाचित्रणात क्रांती घडवत आहेत. लँडस्केप आणि वन्यजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोन महत्त्वाचे साधन बनत आहेत. GPS आणि उच्च गुणवत्तेच्या कॅमेऱ्याने सुसज्ज ड्रोन्स पर्यावरणावर बारीक लक्ष ठेवू शकतात. पर्यावरणीय बदलांचा डेटा गोळा करू शकतात आणि संवर्धन उपक्रमांसाठी सहाय्यभूत होऊ शकतात. रियल इस्टेट क्षेत्रात सुस्पष्ट हवाई प्रतिमा महत्त्वाच्या असतात.

UAV मध्ये खेळण्याच्या आकाराच्या मायक्रोड्रोन पासून अल्ट्रा लॉन्ग रेंज मिलिटरी युवी पर्यंत असतो. टॉय ड्रोन जास्तीत जास्त शंभर फूट उंचीवर पाच मिनिटे उडू शकतात तर ग्लोबल हॉक सारखे प्रगत फिक्सड विंग हजारो मैलावर काम करू शकतात. ट्रान्समिशन सिस्टीम येथे महत्त्वाचे आहे. हॉबीईस्ट ड्रोन मर्यादित सिग्नल स्ट्रेंथ आणि इंटरफेरेंस प्रोटेक्शनसह डायरेक्ट रेडिओ ट्रान्समिशन वापरतात त्यामुळे ते कनेक्शन तुटण्यापूर्वी जास्तीत जास्त पाच मैलापर्यंत पोहोचतात व्यावसायिक ड्रोन अंतर आणि बँक्वेट्स संतुलित करतात १० ते १५ मैलापर्यंत ऑपरेशन साध्य करतात. लष्करी प्रणाली खंडामध्ये नियंत्रण राखण्यासाठी उपग्रह अपलिंक सारख्या मजबूत कॉन्फिगरेशनचा वापर करतात. बहुतेक ड्रोन पायलटच्या कंट्रोलरची थेट जोडणी चा वापर करतात त्यामुळे त्यांचे कार्यक्षमता सुमारे २०-३० मैलांपर्यत मर्यादित होते. नेटवर्कद्वारे व्हिडिओ रिलेट करणारे आणि डेटा नियंत्रण करणारी प्लॅटफॉर्म बरेच अंतर पसरवू शकतात. आधुनिक तंत्रज्ञान-बरेच व्यावसायिक ड्रोन आता १०५ पेक्षा जास्त मिनिटाचा उड्डाण कालावधी देतात जे काही वर्षांपूर्वी केवळ २० किंवा ३० मिनिटांचे होते. ड्रोन त्यांच्या 4k, 12+Mp कॅमेरा आणि उत्कृष्ट चित्र स्थिरीकरणासह तपशीलवार गुळगुळीत फुटेज कॅप्चर करू शकतात. मजबूत ४ के व्हिडिओ आणि सुंदर 20MP स्थिर फोटो कॅप्चर करता येतात. स्वयंचलित उड्डाणपद्धती अडथळे टाळण्याचे सेंसर्स हवाई ऑपरेशन्सला अधिक सुरक्षित आणि विश्वासनीय बनवतात. यामध्ये 540 डिग्रीमध्ये अडथळा टाळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ड्रोनचा वापर प्रकल्पांचे मार्केटिंग करण्यासाठी, डाटा गोळा करण्यासाठी, ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी, एक वेगळा दृष्टिकोन मिळवण्यासाठी, मॅन्युअल ऑपरेशन्स स्वयंचलित करण्यासाठी केला जातो. चित्रपट आणि सामग्री निर्मिती छायाचित्रण-आकर्षक कोन आणी उंची देता येत.
उंची लँडस्केप्स, रियल इस्टेट, कार्यक्रम, लग्न, वन्यजीव इत्यादींचे छायाचित्र. सर्वेक्षण, पायाभूत सुविधा, अपघाताची दृश्ये, मालमत्ता, खाणकामाची ठिकाण, धोकादायक क्षेत्रांचे सुरक्षित सर्वेक्षण, घनदाट जंगल, पर्वतराईचे व्हिडिओ चित्रण, डेटा प्रतिमा आणि माहिती दर्जेदारपणे संकलीत होऊ शकते. तपासणी, सार्वजनिक सुरक्षा, डेटा विश्लेषण, शेती, माल वाहतूक लष्करी सुरक्षा यासाठी ड्रोन वापरता येतात. सार्वजनिक सुरक्षिता, बेपत्ता लोक शोधण्यासाठी, आगी दरम्यान हॉटस्पॉट निश्चित करण्यासाठी, अभ्यास स्थळांचा हवाई फोटो घेण्यासाठी, पोलीस, अग्निशमन सेवा, इन्फ्रारेड ड्रोनचा वापर करतात. डेटा विश्लेषण, शेती, कृषी ड्रोनमध्ये खते आणि कीटकनाशके साठवून ठेवता येतात. असा १० लिटर्सपर्यंत पाण्याचा साठा असतो. पारंपरिक तंत्रापेक्षा पिकांवर रसायने फवारण्यासाठी त्याचा वापर जलद व अचूक क्षेत्रासाठी अचूक वापर जलद गतीने केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे वेळ आणि श्रम वाचतात. त्यामुळे त्यांच्या कामांमध्ये विविधता आणता येते.
भारतातील ड्रोन (UAV) बाजाराचे मूल्य २०२४ सालामध्ये अंदाजे ५४०० ते १०,००० कोटी रुपये झाले होते व २०२५ सालात ते ०.४७ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा ३९०० ते १३००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०३० सालापर्यंत १.३९ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये ८३८१ युनिट्स वरुन २०३० पर्यंत १६७५६ युनिट्पर्यंत ड्रोनची मागणी वाढू शकेल. ही बाजारपेठ संरक्षण, शेती, लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधांसाठी असेल. आयडिया फोर्ज, गरुड एरोस्पेस, आय ओ टेक वर्ल्ड हे भारतातील ड्रोनचे प्रमुख उत्पादक आहेत.
मालवाहतूक आणि वाहतूक स्वायत्त उड्डाण आणि नेविगेशनला अनुमती देण्यासाठी, GPS अडथळे टाळण्यासाठी, प्रगत सॉफ्टवेअर प्रगत नेवीगेशन सिस्टीमसह ड्रोनचे उत्पादन हा एक महत्त्वाचा तांत्रिक विकास आहे. वस्तूंच्या वितरणासाठी आवश्यक असलेले सुरक्षित प्रभावी आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपामुळे ते उपयोगी ठरते. उच्च अचूकता जीपीएस सह ट्रॅकिंग आणि पॅकेज वितरण सुधारले आहे. लष्करी सुरक्षामध्ये सीमा देशाच्या सीमा आणि प्रदेशांवर गस्त घालण्यासाठी स्वतःचा आणि शेजारील देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ऑपरेशनल व स्ट्रॅटेजिक पाळत ठेवता येते, देखरेख करता येते. चित्रपट निर्माते जलद पाठलाग दृश्ये नियोजित ओव्हरस्टेड शॉट्ससाठी UAV वापरतात. रियल इस्टेट एजंट आकर्षक मालमत्तेचे फोटो व व्हिडीओ कॅप्चर करताना नवीन कोनांतून घरे, परिसर, स्थळे दाखवू शकतात. त्यामुळे इस्टेटीची किंमत वाढण्यास मदत होते.

ड्रोनची रचना
सांगाडा प्लास्टिक फ्रेम्स वजनाने हलक्या व नाजूक असतात. धातूच्या साहित्याचा वापर अधिक टिकाऊपणा आणि कडकपणा देतात. कार्बन फायबर सारख्या संमिश्र पर्यायाने ताकद सुद्धा मिळू शकते. उच्च दर्जाच्या फ्रेंम्समुळे अपघात झाल्यास किंवा नुकसान झाल्यास खराब झालेला भाग बदलणे सोपे जाते. चांगला अभ्यास केलेला वैमानिक त्याच्या ड्रोनच्या स्वतःच्या फ्रेम्स डिझाईन करू शकतो. जर फ्रेम हा ड्रोनचा सांगाडा असेल तर ‘फ्लाईट कंट्रोलर’ हा ड्रोन बॉडीच्या मेंदूचे प्रतिनिधित्व करतो. हा साधारणतः ड्रोन्सचा इलेक्ट्रॉनिक मेंदू असतो. या कॉम्पॅक्ट सर्किट बोर्डमध्ये सेन्सर्स आणि प्रोसेसर असतात. जे उड्डाणाला स्थिर करू शकतात. त्याशिवाय ड्रोन उडू शकत नाही. योग्यरीत्या बसवलेला फ्लाइट कंट्रोलर सेंसर आणि फीडबॅक वापरुन सर्व मोटर्सना सतत शक्तीचा पुरवठा करतो. MEMS जायरोस्कोप एक्सलेरोमिटर आणि इतर सेंसर प्रोसेसरला प्रति सेकंड दोन हजार वेळा ओरिएंटेशन डेटा / माहिती पुरवतात. प्रगत सेन्सर फ्युजन या माहितीचे अचूक पोझिशनिंग सुधारणांमध्ये रूपांतर करतात. यामुळे वाऱ्याची मोठी झुळूक किंवा हवेतील अडथळ्यांवर ड्रोन मात करून व्यवस्थित उडू शकतो.

फ्लाईट कंट्रोलर्स इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर्स (ESCs) शी थेट संवाद साधून ड्रोन च्या हालचाली नियंत्रित करतात. त्यांना मोटर स्पिन हाताळणारे मध्यस्थ म्हणता येईल. हे ड्रोनच्या लिफ्ट, होव्हर आणि ट्रान्झिट दरम्यान संपूर्ण प्लॅटफॉर्मचे स्वयंस्थिरीकरण करण्यास मदत करतात. ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर्स ड्रोन्सना ताकद देतात. २५० ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या मॉडेल्स मध्येही उच्च kv रेटिंग RPM प्रति व्होल्ट पुरवता येतात, अल्युमिनियमपासून ते कार्बन फायबर सारख्या अधिक विदेशी पर्यायांपर्यंत साहित्यामध्ये विविधता असते स्टेटर्स बाहेरील कवचासारखे असतात. यात तांब्याच्या ताराचे जाड कॉईल घट्ट गुंडाळलेले असतात. जेव्हा या तारांमधून वीज जाते तेव्हा ते एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करतात, तर रोटर्स हे फिरणारे भाग आहेत आणि त्यांना मजबूत चुंबक जोडलेले आहेत. हे मजबूत चुंबक स्टेटर्स च्या चुंबकीय क्षेत्राची संवाद साधतात आणि रोटरला खूप वेगाने फिरवण्यासाठी ढकलतात आणि ओढतात.

कधीकधी प्रति मिनिट एक लाख राऊंड RPM पर्यंत ESC फ्लाईट कंट्रोलरच्या हालचाली वाढवतात. RPM हळुवारपणे नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या रुंदीवर मोटर्समध्ये व्होल्टेज पल्स करतात. अनालॉग सर्वो मोटर्स व्हेरिएबल पल्स विड्द्ध मॉड्युलेशन PWM सिग्नल वापरतात तर ब्रशलेस
मोटर्सला व्होल्टेज दिशानिर्देश बदलण्यासाठी आणि ध्रुवीयता बदलण्यासाठी विशेषतः डिझाईन केलेले ESC आवश्यक असतात, त्यामुळे काही सेकंदाच्या आत रोटर्सना आश्चर्यकारक वेगाने फिरवणारे, बदलणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार होते. प्रॉप्स आणि लँडिंग गिअर म्हणजेच ड्रोनचे पंख आणि पाय प्रॉप्स हे साध्या कोनातील ब्लेड असतात जे न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार वरच्या दिशेने प्रतिक्रियात्मक बल निर्माण करण्यासाठी हवेला खाली ढकलतात. आघाडीच्या ब्रँडमध्ये DALProp, HQprop व Ethix यांचा समावेश असतो.
लिथियम पॉलिमर बॅटरीचा वापर ड्रोनसाठी करण्यात येतो. ड्रोनच्या चारही मोटर्सला वीज पुरवठ्यासाठी तसेच ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक्ससाठी अॅप्स आणि व्होल्टसची आवश्यकता असते. लिथियम पॉलिमर बॅटरीद्वारे ते पुरवतात. सामान्यतः ड्रोन प्रकार ३९ आणि ६S सेटअप दरम्यान पुरवठा करतात. तीन सेल, ११.१ व्होल्टपर्यंत, चार सेल, १४.८ व्होल्टपर्यंत, पाच सेल, १८.५ व्होल्टपर्यंत आणि सहा सेल २२.२ व्होल्ट पर्यंत क्षमता प्रदान करतात. त्याचा परिणाम जास्तीत जास्त मोटर RPM आणि भ्रस्ट क्षमतांवर होतो. तर उच्च अँप आवर (AH) रेटिंग प्रती चार्ज फ्लाईंग टाईम वाढवते. पावर डिस्ट्रीब्यूशन बोर्ड (PDBs) मुख्य बॅटरीमधून प्रत्येक मोटरला वेगवेगळ्या Esc’s द्वारे ऊर्जा प्रवाहित करतात.
PDBS च्या आवश्यकतेनुसार LED लाइटिंग, FPV कॅमेरे आणि इतर ऑन बोर्ड पेरिफेरल साठी बॅटरी पॉवर देखील वापरतात. फर्स्ट पर्सन व्हयु (FPV) व्हिडिओ सेटअप ड्रोन-माउंट केलेल्या कॅमेऱ्यामधून रियल टाईम फुटेज थेट पायलटच्या डोळ्यांवर किंवा मोबाईल स्क्रीनवर स्ट्रीम करतात. यामुळे ड्रोन चालकाला कॉकपीटमध्ये बसल्यासारखी थरारक अनुभूती येते. कॉपीटमध्ये बसल्यासारखे त्यांचे ड्रोन वैमानिक नेविगेट करू शकतात. कंपन अभाव निर्माण करणाऱ्या प्लेट्सवर बसवलेले एफपीव्ही कॅमेरे सेंसर अत्युत्कृष्ट हवाई दृश्य कॅप्चर/चित्रीत करू शकतात. FPV सिस्टीम ड्रोन-माऊंटेड कॅमेऱ्यापासून पायलटच्या डोळ्यांवर किंवा मोबाईल स्क्रीनवर रिअल टाईम व्हिडिओ स्ट्रीम करते. त्यामुळे ड्रोन चालक कॉकपिटमध्ये बसल्यासारखे त्याचे ड्रोन नेविगेट करू शकतात. पण त्याला एक चांगली रोमांचक अनुभूती मिळू शकते. भविष्यातील ड्रोन्स अलीकडे मनोरंजन आणि व्यावसायिक बाबींसाठी ड्रोन्स वापरले जात आहेत आणि त्यावर संशोधन होत आहे. आपल्या दारापर्यंत उत्पादने पोहोचवण्यासाठी भविष्यात ड्रोन्स वापरले जाणार आहेत. प्रमुख दुकाने लॉजिस्टिक संस्था आणि डिजिटल स्टार्टर्स त्यासाठी सध्या तयारी करत आहेत. येत्या दशकात त्यांचा वेग जास्त होणार आहे. वेग श्रेणी स्वायत्तता आणि क्षमता याबाबतीत भविष्यातील ड्रोन्स यूएसएस प्रणालीपेक्षा चांगले कामगिरी करू शकतात.
गोदामातून थेट घरापर्यंत किंवा व्यवसायातून व्यवसायात शेवटच्या टप्प्यापर्यंत ड्रोन्स एआय आणि पुढील पिढीतील ड्रोन तंत्रज्ञान एकत्र करून आधुनिक पुरवठा साखळ्या पूर्णपणे बदलू शकतात. परिपक्व ई-कॉमर्स प्रणाली जलद वितरणासाठी आणि कमी वेळेमध्ये पुरवठा होण्याबाबत ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे जागतिक व्यवसाय पूर्वर्वीपेक्षा अधिक जवळ आला आहे, जोडला गेलेला आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि अन्न वितरण सेवांकडून मागणी वाढत आहे त्यामुळे पारंपरिक वाहतूक पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे आणि इंधन आणि कामगार खर्च वाढून वाहतुकीलाही ताण येत आहे. अशा परिस्थितीत लॉजिस्टिक्स साठी वापरले जाणारे ड्रोन्स उत्तम उपाय होऊ शकतात. लवकरच क्लाऊड कनेक्टेड ड्रोन ऑपरेशन सुरू होऊ शकतात, जे रस्त्यांच्या मर्यादा वगळून जमिनीवरील प्रवासातील विलंब खूप मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतात.
अॅमेझॉन, युनायटेड पार्सल सर्विस UPS सारख्या मोठ्या ऑनलाइन व्यवहार, पुरवठा करणाऱ्या, कुरियर सेवातील जागतिक संस्था लॉजिस्टिकमधील अडचणींवर ड्रोन्सचा वापर प्रभावी कसा करता येतील यावर संशोधन करीत आहेत. त्यांचे ड्रोन प्रोटो टाईप अडथळे टाळण्याच्या तंत्राचा आणि Al चा वापर करून लहान पेलोड स्वायत्तपणे वाहून नेऊ शकतात. यामध्ये अधिक संशोधन चालू आहे.

जागतिक क्षेत्रात ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या मोठ्य कंपन्या या शक्यतेवर अभ्यास करत आहे. जास्त कार्गो वजनासह बहुतेक मल्टीकॉप्टरमध्ये अजूनही ३० मिनिटांचा मर्यादित सिंगल ट्रिप रेंज असते. गर्दीच्या शहरी भागात लहान प्रवासासाठी ती पुरेशी असली तरी अपग्रेडेड बॅटरी, मोटर्स, हायड्रोज सेन्सर सुधारणा, एआय संचालित प्रक्रिया आणि विमान चालन संगणक अभियांत्रिकी हे स्वायत्त नेवीगेशनची विश्वासार्हता सुधारण्यास मदत करीत आहेत. रेंज वाढवण्यासाठी या बाबींचा प्रभावी वापर कसा करता येईल. यासाठी जगभर संशोधन चालू आहे. दुसऱ्या बाजूला विमान वाहतूक अधिकारी उड्डाण मानके, पायलट पात्रता, प्लॅटफॉर्म निर्बंध, ऑपरेशनल क्षेत्र, मर्यादा आणि संरक्षणासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षा आणि हवाई वाहतूक व्यवस्थापन याची सुयोग्य नियमावली तयार करण्याची बाबही महत्त्वाची आहे.
भविष्यात झिप्टो, UPS, अॅमेझॉन, उबर यांच्या मालकीची ड्रोन्सची छोटी डिलिव्हरी स्टेशन्स शहराच्या आसपासच्या परिसरात आढळू शकते. त्याचा वापर डिलिव्हरीसाठी ते करू शकतात. छोटी बंदर, मॉल्स सुरक्षित घर किंवा मागणीनुसार फिरत्या ग्राउंड वर असे ड्रोन्स भविष्यात दिसू शकतात. ऑर्डर्स मिळाल्यानंतर निवडलेल्या वस्तू योग्य पॅकिंग करून ड्रोन्स खाली सुरक्षित बसवून कमी वेळात सुलभ वाहतूक भविष्यात होऊ शकते.
ग्राहकांच्या वेळेची बचत आणि माल किंवा सेवापुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाहने, वाहतूक, कामगार यासाठी लागणारा खर्च निर्विवाद कमी होऊ शकतो. या क्षेत्रात अमर्याद रोजगाराच्या संधी तरुण वर्गाला होऊ शकतात. त्यादृष्टीने कोणत्या क्षेत्रात काम करता येईल याचा अभ्यास होतकरु तरुणांना करता येईल.
प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भविष्यात ड्रोनचा वापर करता येईल.
(लेखक मंगेश तिटकारे हे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असून, साखर उद्योग आणि कृषी क्षेत्राबाबत त्यांनी विपुल लिखाण केले आहे.)





