चौकशीआधी 49 साखर कारखाने ताब्यात द्या
माणिकराव जाधव यांची मागणी
औरंगाबाद : राज्य शासनाने २५ हजार कोटींच्या साखर कारखान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी फेरचौकशीचा निर्णय घेतला आहे. मात्र आधी खासगी संस्थांना विकलेले ४९ साखर कारखाने शासनाने शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावे, या घोटाळ्यास जबाबदार शरद पवार, अजित पवारांसह गुन्हा दाखल असलेल्या ७६ आरोपींना अटक करावी, अशी मागणी माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केली.
राज्यातील आजारी साखर कारखान्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘सहकार बचाव यात्रा’ काढण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी शुक्रवारी केली.
शेतकरी कामगार महासंघाच्या राज्यव्यापी सहकार परिषदेत ते बोलत होते. या मेळाव्यात शेतकरी कामगार महासंघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर यांची निवड करण्यात आली.
तसेच राज्यातील ४९ साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर असलेल्या विविध सभासद, पदाधिकाऱ्यांची महासंघाच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आदी पदांवर नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाधव यांनी जाहीर केले.
कारखान्यांच्या गैरव्यवहारातून राज्य बँकही ताेट्यात गेली आहे. वर्षाला शेकडो काेटींचे व्याज मिळवणारी बँक ताेट्यात कशी जाते, असा प्रश्न माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केला.
घोटाळा झालेल्या ४९ कारखान्यांपैकी १६ साखर कारखाने मराठवाड्यात असून ते बंद पडले आहेत. यात कन्नड, गंगापूर, रामनगर, घृष्णेश्वर, नांदेडमधील अंबिका, बागेश्वरी, बाराशिव, जरंडेश्वर आदींचा समावेश आहे. कारखान्यांना कर्ज द्यायचे, नंतर ते बंद पाडायचे, पुन्हा तसेच ठेवून द्यायचे व कालांतराने खासगी संस्थेला विकायचे असा प्रकार शरद पवार यांनी केल्याचा आराेप जाधव केला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी १४ हजार सभासदांच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे कर्ज काढून त्यातून ४४ काेटी रुपये मिळवले व ते मुलीच्या नावावरील कारखान्यात रक्कम जमा केल्याचाही आराेप जाधव यांनी केला.
कारखाने खासगीकरणाने कल्याणच : राजेश टोपे
जाधव यांच्या आरोपांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘त्या कारखान्यांबाबत या अगोदरच चौकशा झाल्या आहेत. ज्या खासगी संस्थांनी सहकारी साखर कारखाने विकत घेतले आहेत ते चांगले चालवत आहेत. त्या भागात कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या वेळी सरकारने राबवलेल्या धोरणामुळे कारखान्याच्या भागाचे कल्याण झाले असेल तर त्यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही,’