‘मांजरा’तर्फे अंतिम एफआरपी अदा
विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ.आर.पी. रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्यांना अदा करण्यात आली. गाळप हंगाम २०२२ -२३ मध्ये मांजरा कारखान्याने एकूण ५ लाख ५१ हजार ६११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ४ लाख ८१ हजार ६२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्ही.एस.आय., पुणे यांनी कारखान्याचा अंतिम उतारा ११.५७४ टक्के इतका निश्चित करून दिला आहे. त्या प्रमाणे कारखान्याची
अंतिम एफ.आर.पी. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रक्कम रुपये २७२५ प्रति मे. टन इतकी निश्चित झाली आहे.
कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे तसेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी. पोटी रक्कम रुपये २४०० प्रति मे. टन याप्रमाणे शेतकर्यांना अदा केली आहे. अंतिम एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम रुपये ३२५ प्रति मे. टन याप्रमाणे शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णण संचालक मंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांच्या बँक खात्यावर अंतिम एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम वर्ग करण्यात आली आहे. सदरची अंतिम एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्यांनी संबंधित बँक शाखेतून घेऊन जावी, असे आवाहन कारखान्यातर्फे संचालक मंडळाने केले आहे.