मराठवाड्यात २.३९ कोटी टन उसाचे गाळप, उताऱ्यात लातूर अव्वल
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगामात ६१ कारखान्यांनी गाळप घेतले आणि कालपर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत, २ कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
१५ मार्चपर्यंत मराठवाड्यातील ११ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
सुरवातीला पावसाने दडी मारल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम कसा राहील याची चिंता होती. परंतु मध्यंतरी आलेल्या अवेळी पावसामुळे उसाला चांगलाच आधार दिला. त्याचा फायदा साखर कारखानदारीला होताना दिसतो आहे.
हे साखरेचे उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.४९ टक्के राहिला तर सर्वात कमी साखर उतारा हा बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी ८.११ टक्के इतका राहिला. लातूर पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८७ टक्के, परभणी जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.५९ टक्के, जालना जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.३३ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.११ टक्के तर नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९ टक्के इतका राहिला आहे.
ऊस गाळप हंगाम थांबलेल्या कारखान्यांमध्ये धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि., अरविंदनगर व कंचेश्वर शुगर लि., मंगळूर, छत्रपती संभाजीनगरमधील खडकपूर्णा ॲग्रो लि, जालन्यातील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सिपोरा, बीडमधील जय भवानी सहकारी साखर कारखाना लि., गेवराई व डीव्हीपी कमोडिटी एक्स्पर्ट प्रायव्हेट लि., परभणीतील श्री रेणुका शुगर लि., देवनंद्रा, नांदेडमधील एम व्ही. के. ॲग्रो फूड्स प्रॉडक्ट लि., वाघळवाडा व ट्वेंटीवन शुगर लि., शिवनी तसेच लातूरमधील शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., किल्लारी यांचा समावेश आहे.
जिल्हा ऊस गाळप साखर उत्पादन (ऊस गाळप टनांमध्ये/साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
- छ.संभाजीनगर: १७ लाख ९८ हजार ७४२/ १७ लाख २४ हजार २४५
- जालना : २४ लाख १० हजार ८०६/ २२ लाख ५० हजार १६३
- बीड : ३८ लाख १७ हजार ९९९/ ३० लाख ९५ हजार ८५५
- परभणी : ३२ लाख ६९ हजार १२२/ ३२ लाख ०६ हजार ७००
- हिंगोली : १४ लाख ५० हजार १९१ /१४ लाख ३१ हजार २५०
- नांदेड : १८ लाख ६७ हजार ५६१ / १८ लाख ४८ हजार २७५
- लातूर : ४५ लाख ०८ हजार २७२/ ४७ लाख २९ हजार ६०५
- धाराशिव : ४८ लाख ४३ हजार ०२७/ ४४ लाख १० हजार १८५