‘एमडी’च्या डायरीतून : बाजीराव सुतार
अनेक वर्षे बंद कारखाना अवघ्या 42 दिवसांत सुरू केला
रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, अनेक वर्षे बंद असलेला साखर कारखाना अवघ्या 42 दिवसांमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करणारे, मानाचे अनेक पुरस्कार मिळवणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अर्थात ‘एमडी’ श्री. बाजीराव जी. सुतार यांचा जीवनप्रवास साखर उद्योगात काम करणार्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तो त्यांनी ‘शुगरटुडे’ मासिकाच्या माध्यमातून ‘एमडीं’च्या डायरीतून या कॉलमद्वारे मांडला आहे.
माझे वडील श्री.गुंडा तातोबा सुतार यांनी ‘आदर्श शिक्षक’ ही बिरूदावली आपल्या ज्ञानदानाच्या अविरत पवित्र यज्ञाच्या माध्यमातून मिळविली, याचा मला अभिमान आहे. शेवटी मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. वडील शिक्षक असल्याने शिक्षणाचे महत्व घरातून मिळाले. ठिक आहे, मनात जे व्हायचे होते, जे शिक्षण घ्यायचे होते, ते जरी झाले नाही. कारण जे आपल्या जीवनात नियतीने ठरविलेले असते, त्याच्या पलीकडे व्यक्तीला जाता येत नाही, अशी सर्वसाधारण धारणा असते. परंतु मी मॅनेजिंग डायरेक्टर पदापर्यंत पोहचू शकलो आणि माझ्याकडून जे काही चांगले होणे शक्य आहे, ते करण्यात मला आनंद आहे.
माझे इ. 4 थी पर्यंतचे शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा, शिंदे वस्ती (मणेराजुरी, ता.तासगांव, जि.सांगली) येथे झाले. इ. 5 वी आणि इ. 6 वीचे शिक्षणही तासगांव तालुक्यातील योगेवाडी येथील जि. प. शाळेत झाले. इ. 7 वी जि. प. शाळा मणेराजुरी येथून पूर्ण केली. इ. 8 ते इ. 10 पर्यंतचे शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित महावीर पांडुरंग साळुंखे, मणेराजुरी या हायस्कूल मधून झाले.
नोकरी करता-करता शिक्षण
अलीकडच्या काळात अनेक शैक्षणिक संस्था निघाल्या, परंतु 1980 च्या दशकात रयत शिक्षण संस्था शिक्षणात एक अग्रगण्य शिक्षण संस्था होती. या संस्थेचे ‘कमवा आणि शिका’ अशी योजना होती, ती आजही चालू आहे. स्वत:च्या हिंमतीवर आपणही शिक्षण घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, या विचारधारेने मी 1982 साली कवलापुर महाविद्यालय येथे प्रवेश घेवून 12 वी सायन्स उत्तीर्ण झालो. एमबीबीएस करून डॉक्टर व्हायचे असे मनात स्वप्न होते, परंतु काही कारणास्तव ते हवेतच विरले.
निराशा आली, पण शिक्षण पुढे चालूच ठेवले. आर्टला प्रवेश घेतला आणि पुढे चालून एम.ए., जी.डी.सी. अॅण्ड ए., एमबीए (एचआर आणि मार्केटिंग) पूर्ण केले. बरेसचे शिक्षण नोकरी करत-करत पूर्ण केले. एमपीएससी व दुय्यम सेवा निवड मंडळ या स्पर्धांसाठी प्रयत्न सुरू केले. योगायोगाने माझी दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत जिल्हा परीषदेमध्ये निवड झाली. तसेच त्या काळात नायब तहसीलदार पदासाठी डोमिसाईल व नॅशनॅलिटी सर्टिफिकेटस् प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यााच्या ठिकाणी जावे लागत असे. परंतु ते सर्टिफिकेटस् वेळेत न मिळाल्याने तोही प्रयत्न फसला.
टेल्को ते शेतकरी साखर कारखाना
त्याच काळात 1986 साली टेल्कोची अॅप्रेंटिस परीक्षा कोल्हापूर येथे झाली. तसेच रेल्वेची तिकिट कलेक्टरची परीक्षा हुबळी येथे दिली. याप्रसंगी हुबळी येथे मात्र बस स्टॅन्डच्या बाकावर बसूनच अख्खी रात्र काढावी लागली. त्याच काळात टेल्कोमध्ये अप्रेंटिस पदावर निवड झाली व पुणे येथे अप्रेंटिस सुरू केली. टेल्कोतला पहिला दिवस अत्यंत आनंददायी गेला. अगदी परदेशात नोकरी मिळाल्यासारखी वाटली. हजर होऊन गावी गेलो.
मला टेल्कोत नोकरी मिळाली म्हणून वडिलांना आनंद होता; परंतु मुलगा आपल्यापासून लांब जात आहे याची त्यांना खंत होती, म्हणून त्यांनी लागलीच त्यांचे निकटवर्तीय मित्र व गावातील सांगली कारखान्याचे तत्कालीन संचालक स्व. आनंदराव जमदाडे पाटील यांच्याकडे मनातील गोष्ट बोलून दाखवली. त्यावेळी स्व. वसंतदादा पाटील हयात होते. स्व. आनंदराव पाटील यांनी माझा नोकरीचा अर्ज नेला व शेतकरी सहकारी साखर कारखान्यात जमा केला. मला आठ दिवसातच नोकरीची ऑर्डर आली.
शुक्रवार दिनांक 16/10/1986 साली माझी या कारखान्यात प्रशासन विभागामध्ये नेमणूक झाली. तेव्हापासून माझा साखर कारखानदारीतील वेगवेगळ्या पदांवर काम करण्याचा प्रवास सुरू झाला. स्व. वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल असतांना त्यांना जवळून अनुभवलेचे अनेक प्रसंग आले. त्यांची भेट घेतली व त्यांच्या विचारसरणीचा जवळून अभ्यास, माझ्या जीवनासाठी एक शिदोरी ठरली.
शेतकरी सहकारी साखर कारखान्यात 1986 ते 2006 अशी तब्बल 20 वर्षे सेवा दिली. या काळात प्रशासन, अकौंटस्, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, शेतकी, असेटिक अॅसिड, अनहैड्राईड, कंट्री लिकर, लीगल, लेबर, पर्चेस, कॅटल फीड व पर्यावरण अशा विविध विभागांमध्ये सेवा देण्याची संधी मिळाली. मी अनुभव संपन्न होत गेलो. त्यामुळे अनेक कौशल्ये प्राप्त झाली. या कामांच्या अनुभवाने समृद्ध होत गेलो.
शेतकरी साखर कारखान्यात मला दिग्गज नेत्यांचा सहवास लाभला. स्व. विष्णूअण्णा पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, प्रतीक पाटील, स्व. मदन पाटील, तसेच वारणा कारखान्यातील स्व. श्रीमती शोभाताई कोरे अशा दिग्गज चेअरमनसोबत, तसेच उत्तमराव फाळके, मानसिंगराव जाधव, प्रभाकर भोसले, व्ही. टी. कासार, एस. आर. चव्हाण, व्ही. वाय. पाटील, बी. बी. पवार, व्ही. एस. चव्हाण अशा कर्तव्यनिष्ठ कार्यकारी संचालकांचा सहवास मला लाभला. सर्वांकडूनच मी अधिक चांगले शिकण्याचा प्रयत्न प्रयत्न केला.
कार्यकारी संचालक हे पद सहकारी साखर कारखान्यातील जबाबदारीचे पद असते. सर्वांना बरोबर घेऊन, व्यवस्थापनाने टाकलेला विश्वास सार्थ करायचा असतो. पुढे या पदावर काम करण्याची संधी मिळताच त्याचे सोने केले. इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. स्व. शंकरराव कोल्हे, नंतरचे चेअरमन आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सध्याचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मी एकूण आठ वर्षे कार्यकारी संचालक अर्थात ‘एमडी’ पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
माझ्या व्यावसायिक जीवनातील काही महत्त्वाच्या उपलब्धी मला आपणासमोर मांडण्यात आनंद होत आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखाना येथे 20 वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले. 1997 ते 2006 या कार्यकाळात कार्यकारी संचालकांचे अनुपस्थितीत इन्चार्ज एम.डी. म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
‘वारणा’त कामाचे अनेक विक्रम
2006 साली वारणा समूहात मी चिफ अॅडमिन ऑफिसर पदावर कार्यरत होतो. श्री दत्त आसुर्ले पोर्ले हा कारखाना वारणा समूहाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला. तो चार वर्षांपासून पूर्णपणे बंद होता. मी हे आव्हान स्वीकारले आणि अवघ्या 42 दिवसात वारणेमार्फत चालवण्यास घेतलेल्या या कारखान्याची संपूर्ण दुरूस्ती करून कारखाना व्यवस्थापनाच्या अपेक्षेप्रमाणे वेळेत कार्यान्वित केला आणि विशेष म्हणजे या कारखान्याने 12.34 टक्के रिकव्हरी मिळवून दिली.
माझ्या कामामुळे महाराष्ट्राचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री आणि वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयजी कोरे व वरिष्ठ व्यवस्थापन खूश झाले आणि वारणा व्यवस्थापनाने श्री वारणा कारखाना, भाडेतत्त्वावरील जरंडेश्वर कारखाना, तसेच आजारी साखर कारखाने जयकिसान, बोधेगांव, श्री दत्त आसुर्ले पोर्ले, सुधाकर नाईक कारखाना या 6 कारखान्यांचे सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सोपविली; तसेच एम.डीं.च्या अनुपस्थितीत सर्व कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपविली होती. व्यवस्थापनाच्या विश्वासास पात्र राहात, मी ती उत्तमपणे पार पाडली.
- विशेष कार्य- वारणा साखर कारखाना येथे 44 मेगावॅट को जनरेशन प्रकल्पाकरिता संपूर्ण जमीन खरेदी, भूमिपूजन आणि नंतर संपूर्ण प्रकल्प सर्वांशी संपर्क ठेवत नियोजनबध्दपणे यशस्वीरित्या कार्यान्वित केला.
अवघ्या 4 महिन्यात 3 ईएसपी प्रकल्पांची उभारणी– वारणा साखर कारखाना या ठिकाणी तीन ईएसपी प्रकल्पांची उभारणी केवळ 4 महिन्यात पूर्ण करून विश्वविक्रम नोंदविला. देशातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या पाठीवर असे पहिल्यांदाच घडत होते.
भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या समवेत : 2011 साली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दौरा निश्चित करण्यासाठी आयआयएम, अहमदाबादचे प्रा. समर के. दत्ता यांचेमार्फत विशेष प्रयत्न केले.
E.D.F. MAN company, London यांच्याशी निर्यात करार : वारणा कारखान्याला थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊसचा दर्जा प्राप्त करण्यासाठी तत्कालीन कार्यकारी संचालक श्री व्ही. एस. चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना साथ देताना, E.D.F. MAN चे तत्कालीन एशिया पॅसिफिकचे एम.डी. श्री. सॅचे यांचेशी सुसंवाद साधून सर्व एक्सपर्ट टीमच्या सहकार्याने जवळपास 3 वर्ष साखर निर्यात करून देशपातळीवर साखर निर्यातीत नं.1 चे NFCSF Ltd New Delhi चे पारितोषिक मिळविले. या सर्व कामकाजात एक्सपोर्ट टीमचीही मोलाची मदत मिळाली. - वारणा कारखान्यात कार्यरत असताना श्री हनुमान मंदिरालगतच श्री स्वामी समर्थ व श्री गजानन महाराज मंदिरांची उभारणी व्हावी ही सर्वांची इच्छा होती व त्याप्रमाणे अल्पावधीतच वारणा कारखाना कार्यस्थळावर मंदिराची उभारणी करून त्या दोनही मूर्तींची मिरवणूक व प्रतिष्ठापनेपर्यंत सर्व धार्मिक विधी माझ्या हातून पार पडले हे मी माझे भाग्य समजतो.
- कारखाना कार्यक्षमता, विस्तारवाढ 7500 वरून 9000 टीसाडी व 9000 वरून 12000 टीसीडी-
वारणा कारखान्यात जीएम (शुगर) व जीएम (केमिकल) हे दोन अधिकारी होते. त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या कारखान्यात जे जे काही नवीन करता येणे शक्य आहे, ते ते करण्यासाठी व्यवस्थापनाने व तत्कालीन एमडी यांनी मला संपूर्ण अधिकार दिलेला होता.
मिळालेल्या संधीचे मी सोने करून दाखविले. त्याचप्रमाणे भाडेतत्वावर घेतलेल्या युनिटवर वारणा सेंट्रल ऑफीसमधून नियंत्रण ठेवणे इत्यादी सर्व बाबींचे कामकाज मी बघत होतो. त्यावरील निर्णय देताना स्पष्ट शेरे, तांत्रिक बाबी Minutes of Meetings आणि व्हीएसआय पदाधिकारी-अधिकारी यांचेशी चर्चा, शासकीय अधिकार्यांशी सलोखा, या सर्व बाबी पाहून कारखान्याची गाळप क्षमता 7500 वरून 9000 व नंतर 9000 वरून 12000 टीसीडी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.
यामध्ये ईएसपी बसविताना, को-जन 44 मेगावॅट करीत असताना, कंत्राटदारांच्या कामगारांची सुरक्षितता, आरोग्य याकडे प्राधान्याने लक्ष दिले. संबंधित तांत्रिक कामांचा उरक होण्यासाठी कंत्राटी कामगारांना जागेवरच जेवण, नाष्टा, चहा, टॉयलेट व विश्रांतीसाठी तात्पुरत्या खोल्यांची निर्मिती केली व 3 महिन्यात तीन ईएसपी उभारण्याचा गिनीज बुक ऑफ रेकार्डमध्ये विक्रम नोंदवावा, असे काम करता आले.
व्यवस्थापनाची चतु:सूत्री – आर्थिक व्यवस्थापन, प्रशासकीय उपलब्धता, कामगारांची मानसिकता व ऊस उत्पादकांचा विश्वास.
प्रामुख्याने साखर उद्योगात-
- ऊस उत्पादक शेतकरी
- ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, कंत्राटदार
- कारखाना कामगार, अधिकारी वर्ग व
- व्यवस्थापन मंडळ / संचालक मंडळ
हे महत्वाचे घटक आहेत. या सर्वांचा एक विचार, सकारात्मक द़ृष्टिकोन व ध्येयाने प्रेरित होऊन, सर्वच ठिकाणी पारदर्शीपणा, व्यावसायिकता व विश्वासार्हता जपून त्याप्रमाणे जबाबदारी घ्यावी लागते.
वरील चार पैकी एकानेही अशी विश्वासार्हता गमावली किंवा आत्मविश्वास गमावला तर या चतु:सुत्रीवर चालणार्या संस्थेचे कामकाज, सहकारी साखर कारखानदारीचे कामकाज हे चालूच शकत नाही. त्यामुळे प्रथमत: माझा ऊस उत्पादक, माझा सभासद शेतकरी, माझा ऊस तोडणी मजूर, कंत्राटदार, वाहतूकदार, माझा कामगार व माझे संचालक मंडळ हे विचार त्या त्या भागातील प्रत्येकात रूजलेले पाहिजेत, तरच त्या सहकारी संस्था नावारूपाला येतात. प्रत्येकाने ही संस्था माझी आहे आणि तिचा विकास करणे ही आपली जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधूनच कामाला प्राधान्य दिले तर त्यात यश हमखास मिळते.
‘इंदापूर’चा आलेख उंचावला
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत असलेल्या इंदापूर सहकारी साखर कारखान्यात मी एम.डी. पदाची सूत्रे 7 जून 2016 रोजी घेतली. राज्याचे माजी सहकार मंत्री श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी माझी निवड केल्यानंतर, मी त्यांना माझे कामकाजाचे स्वरूप, माझ्या जबाबदार्या व गेल्या तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव कथन केला. प्रशासकीय शिस्त, आर्थिक शिस्त व सर्वच ठिकाणी आदरयुक्त भीती निर्माण केल्याशिवाय संस्थेची उन्नती होत नाही, हेही पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सांगितले.
पाठीशी असलेल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा पूर्णपणे वापर करत मी इंदापूर कारखान्याचा आलेख उंचावत नेला. दरवर्षी कारखाना सरस कामगिरी करत गेला.
2015-16 साली कारखान्याने 3 लाख 42 हजार मे. टन ऊसगाळप केले होते. 2018 -2019 साली ते तब्बल 10 लाख 48 हजार टनांपर्यंत गेले, यावरून कारखान्याच्या उंचावणार्या कामगिरीचा अंदाज यावा.
………….
स्व. शंकररावजी कोल्हे : एक परिसस्पर्श
सहकारातील अध्वर्यू, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, विधानसभेचे माजी सभापती, सहकार – महसूलसह विविध खाती यशस्वीपणे सांभाळणारे माजी कॅबिनेट मंत्री शंकररावजी कोल्हेसाहेब यांचा सहवास 2021 साली मला अल्पसा जरी लाभला, तरी ते मी माझे भाग्य समजतो.
92 व्या वर्षीही सक्रिय
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात पहिल्याच दिवशी मी हजर होताना संचालक मंडळाचे बैठकीत माझी पहिलीच भेट झाली. त्यांना जवळून बघण्याचा योग पहिल्यांदाच आला. वयाच्या 92 व्या वर्षीही चेहर्यावरील तेज, बारकाईने लक्ष देण्याची तळमळ आणि त्या त्या विषयाशी निगडीत असणार्या टिपणीचे पूर्णपणे वाचन स्वत: करीत असल्याचे पाहून मला प्रथमदर्शनी आश्चर्य वाटले. या वयातही अत्यंत सखोलपणे व बारकाईने लक्ष देण्याची त्यांची जिज्ञासा पाहून मी भारावून गेलो.
नित्य कामकाज करताना रोज सकाळी फॅक्टरीमधील सर्व विभागात त्यांचा राऊंड असो किंवा शुगर हाऊसमध्ये चालत असताना त्या ठिकाणी साखर पडल्याचे दिसल्यास त्याचे बारकाईने निरीक्षण करून त्याच ठिकाणी जाब विचारण्याची पद्धत असो, या सर्व गोष्टी एक कुशल प्रशासक व एक कुशल निरीक्षक याचे द्योतकच असल्याचे ते दाखवून देत होते.
खूप काही शिकलो
त्यांचा अल्प काळातील सहवास मला बरेच काही शिकवून गेला. फॅक्टरीच्या आतमध्ये राऊंडच्यावेळी इंजिनिअरिंगच्या ऑफिसमध्ये या वयातही ते संपूर्ण मशिनरीची माहिती घेत असत. तसेच साखर कारखान्याची मशिनरी ही अद्ययावत असली पाहिजे, हा त्यांचा नेहमीच ध्यास होता.
एकवेळ त्यांनी रिकव्हरीच्या बाबतीमध्ये मला प्रश्न केला की, रिकव्हरी ही कशी मिळाली पाहिजे? मी त्यांना सांगितले की, साखर कारखान्याची मशिनरी ही अद्ययावत असलीच पाहिजे, त्याचबरोबर साखरेची रिकव्हरी जर आपल्याला जास्त मिळवायची असेल तर साखरेच्या रिकव्हरीची निर्मिती शेतात होत असते. यावर ते हसले व मला म्हणाले, अगदी बरोबर आहे. ऊस उत्पादन व रिकव्हरी चांगल्या ऊसाच्या जातीवर अवलंबून आहे. त्यासाठी सर्वच घटकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.
हातात ऊर्जावान हात!
उद्योजकता परिषदेच्या वतीने कोपरगाव येथे जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपवून ते सायंकाळी 4.30 ते 5.00 वाजेच्या आसपास थेट कारखान्याच्या शुगर हाऊसमध्ये आले. आम्ही सर्वजण फॅक्टरीमध्येच होतो.
ते शुगर हाऊसमध्ये उतरल्यानंतर मला म्हणाले, आज सुट्टी आहे. मी म्हणालो, आम्ही सर्वजण सीझन चालू असताना सुट्टी घेत नाही. त्यावर ते हसले व परत आम्ही इंजिनिअरींग विभागाच्या ऑफीसमध्ये जाऊन बसल्यानंतर थोडावेळ चर्चा केली व गाडीमधून जाताना त्यांनी माझ्या हातात हात दिला. याचे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. सहसा कोणाच्या हातात हात देत नाहीत, हाच परिसस्पर्श मला बराच काही देऊन गेला. यालाच म्हणतात आपल्यातील उर्जा इतरांना देणे.( Exchange of Magnet)
ते अचानक आजारी पडल्याने त्यांना नाशिक येथील दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले होते. त्याच कालावधीमध्ये कारखाना कार्यस्थळावर श्री गुरूचरित्र पारायण सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे चालू होता. अध्यात्म व विज्ञान याची कायम कास धरून चालणारे ते दवाखान्यातून बरे होऊन आल्यानंतर गुरूचरित्र पारायणास भेट देऊन गेले.
सन 2022 च्या महाशिवरात्रीदिनी आम्हाला कारखाना सुरू असल्याने कुठेही जाता आले नाही. त्या दिवशी सकाळी ते स्वत: फॅक्टरीमध्ये राऊंडला आले होते. आम्ही सर्वांची भेट झाली. त्यावेळी मी सर्वांना म्हणालो, प्रत्यक्ष देवच आपल्या भेटीला आले. कारण त्यांच्या नावातच शंकर होते.
तीन पिढ्यांसोबत काम : त्रिवेणी संगमच
स्व.शंकरराव कोल्हे, बिपीनदादा व आता विवेकभैया अशा तीन पिढयांसोबत काम करण्याचा मला लाभलेला योग हा एक त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल.
स्व.कोल्हेसाहेब यांच्या पश्चात एक आधारवड म्हणून आदरणीय माई या आपणा सर्वांनाच प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांचेशी ज्या ज्यावेळी बोलणे होते, त्या त्यावेळी माई या सुध्दा तितक्याच प्रगल्भ विचारसरणीच्या आहेत. त्या नेहमीच म्हणतात, माझ्या वडिलांनी मला संपूर्ण देश दाखविला आणि कोल्हेसाहेबांनी मला संपूर्ण जग दाखविले.
त्यांचे बोलणे हे नेहमी ऐकतच राहावेसे वाटते. एकेक वाक्यांमध्ये परिपूर्ण अभ्यास, अधूनमधून इंग्रजी शब्द त्या बोलत असतात. हे त्यांचे बोलणे, अनुभवाचे बोल, तासन्तास ऐकतच रहावेसे वाटते. त्यामुळे त्यांचे भेटीतील वेळ कधी निघून गेला हे उमजलेच नाही.
अतुलनीय कार्य
त्याचबरोबर कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते व हे सर्व कुटुंब साहेबांच्या मार्गदर्शनातून सहविचारांतून तयार झालेले आहे. कोपरगांव तालुक्यात, नगर जिल्हयामध्ये व राज्यात अनेक कार्यकर्ते व अधिकार्यांना स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या परिस्पर्शाने त्यांच्या जीवनाचे सोने करता आले. त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, नॅशनल हेवी इंजिनिअरींग पुणे, महाराष्ट्र राज्य साखर संघ व देशपातळीवरील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., इंडियन शुगर एक्सपोर्ट/इम्पोर्ट कॉर्पोरेशन नवी दिल्ली इ. सहकारी संस्थेत त्यांनी केलेले कार्य हे अविरतपणे आपणास प्रेरणादायीच ठरेल.
तिसरी पिढी जपतेय वारसा
एक उत्तम राजकारणी, अभ्यासू नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युवकांना संधी देणारे एक आदर्श नेते, राज्याचे मार्गदर्शक, त्यांचे करारी बाण्याने अखंडपणे व अविरतपणे ‘एक संघर्ष योद्धा‘ म्हणून लढत राहण्याची प्रवृत्ती ही सर्वांना प्रेरणादायीच ठरेल.
त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मृत्युशी झुंज दिली व अखेर वयाच्या 93 व्या वर्षी 16 मार्च 2022 रोजी ते आपल्यातून अनंतात विलीन झाले. त्यांनी घालून दिलेले आदर्शवत नियम, ध्येय-धोरणे पुढची पिढी अथक मेहनत घेऊन राबवत आहेत. तसेच गोरगरिबांचे आधारवड व शेतकर्यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते, हे त्यांनी शेवटपर्यंत जपले. अशा या थोर, महान विभूतींचा माजी जीवनात सहवास लावला हे मी माझे भाग्य समजतो.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यातील उल्लेखनीय कामगिरी
- श्री. बाजीराव जी. सुतार,
(एम.ए., जी.डी.सी. अॅण्ड ए.,एम.बी.ए.)
मॅनेजिंग डायरेक्टर,
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.
Congratulations Saheb,
I was worked with you In Warana sugar since 2007 To 2014.as a Mfg. Chemist.
At present l am working in Green Power Sugar Gopuj. Tal khatav Satara, As a Dy. Chief Chemist.
Thanks for feedback