ऊसतोड मजुरांसाठी मिशन साथी योजनेचा उद्यापासून प्रारंभ

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी आता पुन्हा एकदा ‘मिशन साथी’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७) होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेच ही ‘मिशन साथी’ योजना कार्यान्वित होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या आरोग्य आणि इतर सुविधांसाठी ऑक्टोबर २०१० मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘आयुर्मंगलम’ ही योजना सुरू झाली होती; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ही योजना सक्षम राहिली नाही. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळेच २०१९ मध्ये ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या समितीने नवीन ‘एसओपी’ ठरवून दिल्या. त्याचीही सुरुवातीचे एक-दोन वर्षच प्रभावी अंमलबजावणी झाली होते.
‘मिशन साथी’ काय करणार?
ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करत प्रत्येकाला ओळखपत्र देणार., महिलांची नियमित आरोग्यविषयक तपासणी होणार., प्रत्येक गटात (टोळी) एक महिला कामगारच ‘आरोग्य साथी’ म्हणून काम करणार. तिला आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देऊन प्रथमोपचार किट देणार., गावांतील आशाताईसह इतर आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात राहणार., दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात गेल्यावरही तेथून ती बीडमध्ये संपर्क साधणार.