किल्लारी कारखाना चार लाख टन गाळप करणार : आ. अभिमन्यू पवार
औसा: किल्लारी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आणि कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणे हे मोठं आव्हान असले तरी ते आव्हान मी स्वीकारले आहे. पुढील गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून योग्य नियोजन करून ते उद्दीष्ट आम्ही गाठ, असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी साखर कारखाना येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
सोमवारी कारखाना सभागृहात आयोजित सत्कार कार्यक्रमात पवार बोलत होते. किल्लारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आ. पवार यांची निवड झाल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी ज्येष्ठ संचालक, मतदारसंघातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध सोसायटींचे चेअरमन, भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने आ. पवार यांचा सत्कार करण्यात आला.
आ. पवार म्हणाले की, साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजन दिवस मेहनत घेऊन कारखाना सुरू केला आहे. आघाडीच्या अवसायक मंडळाने कारखाना खरोखरच प्रयत्न सुरू करण्याचा केला. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. कारखान्याचे गतवैभव निर्माण करून राज्यात एक आदर्श कारखाना करण्याचा प्रयत्न राहणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी कारखान्याला पन्नास कोटी रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे कारखान्या परिसरातील जागेत २०० दुकाने बांधणार आहोत, इतर साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.