मार्चसाठी २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी असले तरी केंद्र सरकारने कोट्याच्या किमान ९० टक्के प्रमाणात साखर विक्री करणे कारखान्यांसाठी अनिवार्य केले आहे. अनेक कारखान्यांना गेल्या महिन्यातील साखर विक्री कोटाही अद्याप संपवता आला नसल्याचे चित्र आहे.
फेब्रुवारीमध्ये २२ लाख टनांचा कोटा दिला होता. या महिन्यात साखरेला चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारशी मागणी नाही यामुळे दरात फार वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात मंदी आहे. संक्रांतीनंतर दर ३४०० रुपये क्विंटलच्या आसपास राहिले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेय व मिठाई उद्योगाकडून साखरेला सातत्याने मागणी असते. यामुळे साखरेची उलाढाल मोठी असते. यंदा मात्र साखर बाजारात तेजी दिसत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात अजूनही एक ते दोन महिना साखर हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन महिने तरी मुबलक साखर तयार होईल अशी चिन्हे आहेत. यामुळे कमी उत्पादन असूनही साखर टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कारखान्यांना कमी दरातच साखर विकावी लागणार असल्याने कारखानदार अस्वस्थ आहेत.
केंद्राने कोटा वाढवून दिल्याने साखर कारखान्यांना साखर विक्री करणे आव्हानात्मक ठरणार आहे.