आज नागपंचमी
आज शुक्रवार, ऑगस्ट ९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १८, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:१८ सूर्यास्त : १९:१०
चंद्रोदय : १०:०५ चंद्रास्त : २२:१०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०३:१४, ऑगस्ट १० पर्यंत
नक्षत्र : हस्त – ०२:४४, ऑगस्ट १० पर्यंत
योग : सिद्ध – १३:४६ पर्यंत
करण : बव – १३:५५ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०३:१४, ऑगस्ट १० पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : ११:०७ ते १२:४४
गुलिक काल : ०७:५४ ते ०९:३१
यमगण्ड : १५:५७ ते १७:३३
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०८:५२ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : १३:१० ते १४:०१
अमृत काल : १९:५७ ते २१:४५
वर्ज्य : ०९:०५ ते १०:५३
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll
फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमिचा सण आला डोळे माझे ओले – कवी – ग.दि. माडगूळकर
आज नागपंचमी आहे.
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.
कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण – खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला.
जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता.
जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. – मगधनरेश बृह्दरथ या राजाच्या राण्यांचे अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राक जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो.
बुध व बृहस्पती बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.
आज जरा जिवांतिका पूजन आहे.
चरक : चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो.
या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि या नावाच्या अनेक व्यक्तीही आहेत. त्यांतील एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती आयुर्वेदातील चरकसंहिता या नावाने प्रसिद्ध असलेल्या महान ग्रंथाचे कर्ते. त्यांच्या या ग्रंथात उत्तर भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशाची वर्णने आढळतात. यावरून ते त्या भागातील रहिवासी असावेत. ज्या कनिष्क राजाच्या पदरी ते राजवैद्य होते त्याची राजधानी याच भागात होती. इ.स.पू. पहिल्या शतकाच्या सुमारास हा राजा होऊन गेला असावा, असे एक मत आहे. राजा कनिष्क व आर्य नागार्जुन समकालीन व्यक्ती असाव्यात. कनिष्काचा काळ अनिश्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे. याविषयी तीन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे : इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ.स. १२३. यांपैकी शेवटच्यास जास्त पाठिंबा मिळतो. त्रिपिटक या बौद्ध ग्रंथाच्या चिनी भाषांतरात (इ.स. ४७७) कनिष्काच्या राजवैद्यांचे नाव चरक असल्याचा उल्लेख आहे. याच चरकांनी मूळच्या अग्निवेश- तंत्र या ग्रंथाचे पुनःसंपादन केले असावे, असे मानले जाते.
चरक हे नाव फार प्राचीन वेदकालीन आहे. ‘चरक’ शब्दाचा भ्रमणशील असा व्युत्पत्त्यर्थ आहे.
कृष्ण यजुर्वेदाच्या एका शाखेच्या प्रवर्तक ऋषीचे नाव चरक आहे. ललित विस्तार ग्रंथात हिंडणाऱ्या संन्याशांना चरक संबोधिले आहे. चक्र धारण करणारे तसेच योगाभ्यास करणारे यांनाही चरक संज्ञा दिली जाते. बृहदारण्यक उपनिषदात ‘मद्रेषु चरकाः पर्यव्रजाम’ (म्हणजे ‘आम्ही फिरत फिरत मद्र देशाला गेलो’ ) असा उल्लेख आहे. वैशंपायनाच्या शिष्यांना चरक म्हणत.‘चरक’ म्हणजे ‘प्रायश्चित्त करणारे’ असाही एक अर्थ आहे. वैशंपायनाकरिता प्रायश्चित्त करणारे ते चरक.
वैशंपायनशिष्य याज्ञवल्क्यांनी मात्र वैशंपायनाकरिता प्रायश्चित केले नव्हते. जे विद्यार्थी एका गुरूजवळ शिक्षण संपवून दुसऱ्याकडे ज्ञान संपादनाकरिता हिंडत जात त्यांनाही चरक म्हणत.
अशा प्रकारे चरक शब्दाचा उपयोग अनेक अर्थांनी केलेला आढळतो. ‘चरक’ मानवाचे हित करण्याकरिता हिंडत आणि जनतेची मानसिक व शारीरिक दुःखे दूर करीत. म्हणून पुढे चरक या शब्दास वैद्य हा अर्थ प्राप्त झाला असावा.
आज आचार्य चरक जयंती आहे.
दुसर्या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंर्त्य दिले नाही, तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. हा स्वातंर्त्यासाठीचा अंतिम लढा होता. ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ हे दोन स्फूर्तिदायक मंत्र या लढय़ाने दिले. या आंदोलनाची सुरुवात ९ ऑगस्ट १९४२ रोजी झाली होती. त्यामुळेच हा दिवस ‘ऑगस्ट क्रांतिदिन’ म्हणून पाळला जातो.
आज भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन आहे.
कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते.
आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.
आज विश्व आदिवासी दिवस आहे.
‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ।
सुखी आहे पोरं सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परि मन खंतावतं ।
विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आंचवलं ।
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो ।
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार ।
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फूल वेचायला नेशील तू गडें ।
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ।
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला।’
- श्री कृ. ब.निकुंब
१९२०: घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म. ( मृत्यू: 30-06-1999 )
डॉ. विनायक कृष्ण गोकाक प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक व शिक्षणतज्ञ यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील सावनूर येथे झाला . काव्यलेखन ‘विनायक’ ह्या नावाने करीत होते. मुंबई आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांचे ते एम्.ए. (इंग्रजी) केले .
इंग्रजीचे नाणावलेले प्राध्यापक व शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे. इंग्रजीतील त्यांची ग्रंथनिर्मितीही विपुल आहे. पुणे, सांगली, हैदराबाद, वीसनगर, कोल्हापूर, धारवाड येथे ते इंग्रजीचे प्राध्यापक वा प्राचार्य म्हणून होते. त्यांनी अनेक मानाच्या व जबाबदारीच्या जागी काम केले. हैदराबाद येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’ चे १९५९—६६ ह्या कालावधीत संचालक होते. बंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून १९६६—६९ ह्या कालावधीत जबाबदारी पार पडली.
१९७०-७१ कालावधीत सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडी’चे संचालक , तर ‘ऑल इंडिया सत्य साई एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’चे सभासद, भारतीय ज्ञानपीठाचे सभासद इ. मानाची पदे त्यांनी भूषविली.
प्रतिभासंपन्न कन्नड नवकवींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कन्नड काव्यात काही प्रवाह आणले व विविध प्रयोगही केले. त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो. भारतीय संस्कृतीचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या कवितेस आहे.
१९६० साली त्यांच्या द्यावापृथिवी ह्या कन्नड काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. १९६० मध्येच भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला.त्याप्रमाणेच कर्नाटक विद्यापीठ १९६७ मध्ये आणि पॅसिफिक विद्यापीठाने (कॅलिफोर्निया) १९६९ मध्ये त्यांना सन्मान्य डी.लिट्. देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)
- घटना :
११७३: पिसाच्या मनोर्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
१९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
९ ऑगस्ट, २०१९ : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचना जारी करीत ‘अनुच्छेद ३७०’ रद्द केले. अनुच्छेद ३७० पूर्णतः संपुष्टात आणलेले नाही. त्यातील उपकलम १ कायम असून त्याद्वारे या अनुच्छेदातील अन्य सर्व विशेष लाभ राष्ट्रपतींनी विशेषाधिकारानुसार रद्द करण्यात केले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने याच अनुच्छेदाचा आधार घेऊन १९५४मध्ये लागू केलेला अनुच्छेद ३५-अ देखील आता घटनाबाह्य़ ठरला. त्यामुळे राज्याबाहेरील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे. आर्थिक दुर्बलांसाठी लागू होणारे दहा टक्के आरक्षणही आपोआप लागू होईल.
अनुच्छेद रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबरच जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि हा संपूर्ण भूप्रदेश केंद्रशासित करणारे विधेयकही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडले. हे विधेयक १२५ विरुद्ध ६१ मतांनी संमत करण्यात आले. जम्मू-काश्मीर तसेच, लडाखला दहा टक्के आर्थिक आरक्षण लागू करणारे विधेयकही आवाजी मतदानाने संमत करण्यात आले होते.
• मृत्यू :
• १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन. (जन्म : ९ ऑगस्ट, १८१९)
• १९४२ : हुतात्मा शिरीषकुमार यांचे तरुण वयात देशासाठी बलिदान ( जन्म : २८ डिसेंबर, १९२६ )
• २००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)
• २०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून ,१९१५)
- जन्म :
१८९०: संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ आक्टोबर, १९२१)
१९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.