राष्ट्रीय साखर उद्योगातील गुणवत्ता पुरस्कारांचे गुरुवारी वितरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्या जाणार, साखर उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय साखर उद्योग गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. ३ जुलै २०२५ रोजी शानदार सोहळ्यात पार पडत आहे.

राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील प्रतिष्ठित गुणवत्ता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १० पारितोषिके पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, ज्यामध्ये देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने आणि नऊ राज्यातील साखर संघ सदस्य आहेत, या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात.

तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप आणि सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रांतील देदीप्यमान कामगिरीबद्दल हे मानाचे गुणवत्ता पारितोषिके दिले जातात. वर्ष २०२३-२४ साठीची एकूण २५ पारितोषिके केंद्रीय सह सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निश्चित करण्यात आली असून, महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ती यापूर्वीच जाहीर केली आहेत. यंदा देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांनी या पुरस्कारांसाठी भाग घेतला होता.

पुरस्कार विजेत्या राज्यांची क्रमवारी:

  • महाराष्ट्र: १० पारितोषिकांसह प्रथम क्रमांक.
  • तमिळनाडू: ५ पारितोषिकांसह दुसऱ्या क्रमांकावर.
  • उत्तर प्रदेश: ४ पारितोषिकांसह तिसऱ्या क्रमांकावर.
  • गुजरात: ३ पारितोषिकांसह चौथ्या क्रमांकावर.
  • पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश: प्रत्येकी एक पारितोषिक प्राप्त.

पुरस्कार वितरण समारंभ आणि उपस्थित मान्यवर: या प्रतिष्ठित पारितोषिकांचा वितरण समारंभ येत्या ३ जुलै रोजी राजधानी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे संपन्न होत आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

या समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री श्रीमती निमूबेन बंभानिया आणि माजी केंद्रीय मंत्री व हरियाणातील ऋषीहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, कर्नाटकचे ऊस मंत्री शिवानंद पाटील, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तांत्रिक परिसंवाद आणि प्रदर्शन: पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच, २ जुलै रोजी तांत्रिक सेमिनार आणि २ व ३ जुलै असे दोन दिवस साखर उत्पादनाशी निगडित भव्य प्रदर्शन याच ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) ऊस शेतीमधील वापर या विषयावरील परिसंवाद आणि चर्चा सत्राचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कुमार दास, असिस्टंट डायरेक्टर जनरल (क्रॉप सायन्स), इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च, केंद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार हे राहणार आहेत.

 बारामती येथील कृषी विज्ञान ट्रस्टचे केंदाचे विश्वस्त प्रतापराव पवार यांना या विषयावर बोलण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. गट चर्चेचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी (अ‍ॅडवायझर, कृषी मंत्रालय), डॉ. पी. गोविन्दाराज (डायरेक्टर आय.सी. ए.आर, शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट) आणि डॉ. आर.बी. डौले (चीफ केन अ‍ॅडवायझर, नॅशनल फेडेरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज) हे राहतील.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »