सौर ऊर्जेबाबत साखर उद्योगाचा थंडा प्रतिसाद, १५ रोजी पुन्हा बैठक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही सहभाग घ्यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीनंतरही एकाही साखर कारखान्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची येत्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यासंदर्भात साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्वांना पत्रे पाठवली आहेत, त्या म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने दि. ३१ डिसेंबर २०२० अन्वये, नवीन व नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जा धोरण जाहीर केले असून, ते ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू आहे.

शासनाचे सन २०२५ पर्यंत २५,००० मेगा वॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट १२९३० मे. वॅट इतके आहे. यामध्ये १०,००० मे. वॅट खासगी विकासामार्फत आणि २००० मे. वॅट रुफ टॉप असे आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत नियमाक आयोगाने नित्य नूतनशील ऊर्जा खरेदीचे बंधन (सौर व बिगर सौर) राज्यातील विज वितरण कंपन्यांना लागू केले आहे. यामुळे सर्व विज वितरण कंपन्यांना त्यांच्या परवाना क्षेत्रावरील एकूण विज वापराच्या तुलनेत विशिष्ट प्रमाणात अपारंपरिक ऊर्जा खरेदी करणे आवश्यक आहे.

याबाबत या कार्यालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर प्रकल्प उभारण्याच्या उपक्रमासाठी करावयाच्या उपाययोजना व आवश्यक त्या मदती करिता या कार्यालयामार्फत संदर्भ क्र. २ अन्वये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा), पुणे, महात्मा फुले रिन्हुऐबल एनर्जी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लि. (महाप्रित) तसेच महावितरण, प्रकाशगड मुंबई यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, असे पत्रामध्ये म्हटल आहे.

त्यानुषंगाने या कार्यालयाने साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लि. (महाप्रित) सोबत सामंजस्य करार (MOU) करण्याचे प्रस्तावित आहे.
तथापि, अद्यापपर्यत राज्यातील कोणत्याही साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबविणेबाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. साखर कारखान्यात प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची कार्यवाही करणेबाबत येणाऱ्या अडचणीबाबत प्रत्यक्ष चर्चा/ संवाद होणे आवश्यक आहे. तसेच सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करुन देणाऱ्या कंपन्या, प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या संस्था आणि तांत्रिक सहाय्य देणाऱ्या संस्थांची एक संयुक्त सभा घेणे आवश्यक आहे.

यासाठी मंगळवार, दि. १५/१०/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर बैठकीस आपण आपलेकडील माहिती / आवश्यक ती कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »