ओंकार समूहाचे पुण्यात कार्यालय

साखर आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन, ४२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
पुणे : ओंकार साखर कारखाना समूहाने येत्या गळीत हंगामात ४२ लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.
ओंकार समूहाचे चांदापुरी (सोलापूर), अंबुलगा (लातूर), राधानगरी (कोल्हापूर) आणि हिरडगाव (अहिल्यादेवीनगर) असे चार साखर कारखाने आहेत. ओंकार समूहाने पुण्यात मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बडेकर ग्रुपचे प्रवीण बडेकर, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, भाजप युवा कार्यकर्ते राजेंद्र कोरेकर, दिनेश दरेकर, लोणी काळभोर सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, ओंकार कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रे-पाटील, प्रशांत बोत्रे-पाटील, डॉ. गौरी बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे- पाटील त्याचबरोबर चांदापुरी, निलंगा, फराळे व हिरडगाव कारखान्याचे व्यवस्थापक अनुक्रमे बी.आर. वाघमोडे, बी.पी. मोरे, आर.टी.यादव, महेश पोरे, सागर मार्तंडे, किरण चव्हाण, नानासाहेब जाधव आदींसह मित्र परिवार आणि हितचिंतकांची मोठी गर्दी होती.
युनिट एक चांदापुरीच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची कामे, गाळप क्षमतेत वाढ, इथेनॉल व वीज प्रकल्प, कंपोस्ट खत, पेट्रोल पंप यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या हंगामात हे प्रकल्प कार्यान्वित होणार असून, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव देता येईल, असा विश्वासही बोत्रेपाटील यांनी बोलताना व्यक्त केला.
चारही युनिटमधील गळीत हंगामपूर्व कामे प्रगतिपथावर आहेत. दरवर्षीप्रमाणे येत्या गळीत हंगामानंतर ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदरांची बिले वेळेत दिली जातील. चार कारखाने सुरू झाल्याने संबंधित परिसराचा कायापालट होऊन चारही ठिकाणी रोजगार निर्मिती झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.